केआयटीच्या वतीने नूतन कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे उत्साहपूर्ण स्वागत.

Spread the news

केआयटीच्या वतीने नूतन कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे उत्साहपूर्ण स्वागत.
उच्च शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख शिक्षणासाठी संयुक्त प्रयत्नांची ग्वाही

­

 

  •  

कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त प्रदत्त) महाविद्यालयाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन तसेच संस्थेचे विश्वस्त श्री. भरत पाटील आणि श्री. सुनील कुलकर्णी यांनी कुलगुरूंचे स्वागत करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. या भेटीने केवळ औपचारिक स्वागतापुरते मर्यादित न राहता उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढ, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षण याविषयी सकारात्मक दिशादर्शक चर्चा घडून आली.
कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी संवाद साधताना सांगितले की, “उच्च शिक्षण संस्थांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था म्हणून न राहता विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, नेतृत्वगुण, संशोधनवृत्ती आणि उद्योजकीय विचार विकसित करणारे केंद्र बनले पाहिजे. विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे ही आजच्या शिक्षणव्यवस्थेची प्रमुख गरज आहे.” ते पुढे म्हणाले की, “केआयटी सारखी दर्जेदार संस्था ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग, संशोधन संस्था आणि समाज यांच्याशी अधिक सशक्त संबंध निर्माण करत आहेत ते कौतुकास्पद आहे.”
यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. साजिद हुदली यांनी सांगितले की, “ डॉ. कामत यांचे शैक्षणिक नेतृत्व, दूरदृष्टी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील व्यापक अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर कुलगुरूपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नव्या संकल्पना, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक उपक्रम आणि परिणामकारक संशोधन यांद्वारे अधिक सक्षम होईल. विद्यापीठ आणि संलग्न संस्थांमध्ये अधिक समन्वय निर्माण होऊन विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी केआयटीकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही संस्थेच्या वतीने देण्यात आली.
केआयटीचे उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन यांनी संशोधनाला सामाजिक आणि औद्योगिक मूल्य प्राप्त होण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, प्रयोगशाळेतील कल्पना प्रत्यक्ष जीवनात परिणाम घडविणाऱ्या तंत्रज्ञानात रूपांतरित झाल्या पाहिजेत.आज संशोधनातून पेटंट्स निर्माण होत असले तरी त्यांचे समाजोपयोगी उत्पादनांमध्ये आणि उद्योगांमध्ये रूपांतर होणे तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यापीठ, उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नवसंशोधनाला चालना मिळू शकते आणि विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थीकेंद्रित, प्रकल्पाधारित आणि अनुभवाधारित शिक्षणावर भर देण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि उद्योग सहभाग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविता येईल.
या बैठकीदरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे राबविणे, उद्योग क्षेत्रासाठी सक्षम आणि कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करणे, इनोव्हेटिव्ह अध्यापन पद्धती विकसित करणे, संशोधन संस्कृती वृद्धिंगत करणे आणि रोजगारक्षम शिक्षणाला चालना देणे या विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली.
बैठकीत विद्यापीठ आणि केआयटी यांच्या संयुक्त सहकार्याने संशोधन प्रकल्प, स्टार्टअप्स, नवोपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरण, कौशल्य विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि उद्योग–शिक्षण भागीदारी या क्षेत्रांमध्ये भविष्यात अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
फोटो तपशील
शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. साजित हुदली यांच्या हस्ते उत्स्फूर्त व भव्य स्वागत करण्यात आले. सोबत डावीकडून संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, विश्वस्त श्री. सुनील कुलकर्णी, श्री. भरत पाटील,उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!