मी अनेक वर्षे शेती करतोय परंतु; कृत्रिम बुद्धिमत्तेसारखा चांगला ऊस आयुष्यात पाहिला नाही
मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
करनूरमध्ये शेतकऱ्यांसमवेत केली शिवारफेरी
ऊस शेतीमधील ए. आय. तंत्रज्ञानावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट- पुणे व कृषी विज्ञान केंद्र- बारामती यांच्या संयुक्त विद्यमानेसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आयोजन
५०० हून अधिक शेतकऱ्यांची कार्यशाळा व चर्चासत्राला उपस्थिती
करनूर, दि. २९:
मी अनेक वर्षापासून शेती करतोय. परंतु; ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर आलेल्या उसाएवढा चांगला ऊस मी आतापर्यंत आयुष्यात कधीही पाहिला नाही, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ऊस शेतीमध्ये ए. आय. तंत्रज्ञानाशिवाय आता पर्यायच उरलेला नाही. यामध्ये सर्वच शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे. कोणत्याही साखर कारखान्याच्या माध्यमातून करा परंतु; ऊस शेतीमध्ये ए. आय. तंत्रज्ञान वापराच, असे आवाहनही त्यांनी केले.
करनूर ता. कागल येथे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांसमवेत शिवारफेरी केली. ऊस शेतीमध्ये वापरलेल्या ए. आय. तंत्रज्ञानामुळे वाढ झालेल्या उसाची श्री. मुश्रीफ यांच्यासह सर्वांनी पाहणी केली. त्यानंतर झालेल्या ऊस पीक परिसंवादामध्ये पाचशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले.
मंत्री श्री. भाषणात पुढे म्हणाले, ए. आय. शिवाय ऊसशेतीला आणि साखर कारखानदारीला पर्याय नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे ऊस गाळप पाहता जिल्ह्यातील सरासरी ऊस उत्पादन एकरी २४ टनांवर आले आहे. ही बाब शेतकरी, शेती आणि साखर कारखानदारीसाठीही चिंताजनकच आहे.
ऊस शेतीमध्ये ए. आय. चा वापर करून हे उत्पादन एकरी किमान ६० टन व त्याहून अधिक वाढवता येईल. त्यामुळे सध्या तीन महिने चालत असलेले साखर कारखाने सहा महिन्यांपर्यंत चालतील. तरच साखर कारखानदारी आणि पर्याय यांनी शेतकरी टिकेल.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी उत्तम परीट म्हणाले, ए. आय. वर आधारित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुरू आणि पूर्व हंगामी १०० टन आणि आडसाली ऊस लागवडीमध्ये एकरी सव्वाशे ते दीडशे टन ऊस उत्पादन काढण्याची हमी आहे.
ए. आय. साठी शून्य खर्च…….!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ए. आय. वापरासाठी प्रतिहेक्टरी रू. २५ हजार खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून रू. १८,२५० राज्य सरकार देणार आहे. साखर कारखाना रू. ६, ७५० व केडीसीसी बँक रू. नऊ हजार देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर एक रुपयाचाही बोजा पडणार नाही.
बारामती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तुषार जाधव “ऊस पिकात ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर व महत्व” या विषयावर बोलताना म्हणाले, माती परीक्षण करणे गरजेचे आहे. मातीमध्ये कोणते घटक कमी आहेत, त्याची पुरेपूर माहिती मिळेल. त्यामुळे उसाचे उत्पन्न वाढीसाठी उपयोग होईल. मातीचा पहिला वर्ग असणे गरजेचे आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीची खते, पाचट, शेणखत, गांडूळ खत, शेतामध्ये टाकणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ऊस शेतीचा फेरपालट करा. तसेच; ऊस पिकासाठी पाणी नियोजन महत्त्वाचे आहे. जमिनीमध्ये वाफसा कसा निर्माण होईल, याकडे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून तुमच्या जमिनीची सर्व माहिती घेऊन त्या आधारे तुम्हाला मार्गदर्शन करेल. येत्या काळात AI डॉक्टर बसविणे काळाची गरज आहे.
भारती ग्रीनटेकचे विनायक पोळ “ए. आय. तंत्रज्ञानामध्ये जिवाणूचे महत्त्व” या विषयावर बोलताना म्हणाले, रासायनिक, सेंद्रिय व जैविक हे तीन घटक एकत्र करून आपण शेती करू तर आपले उत्पन्नात वाढ नक्कीच होणार. उसाच्या अधिक उत्पन्नासाठी चांगली खते दिली पाहिजेत. शेण खतातून चांगले जिवाणू मिळतात. 200 लिटर पाणी त्यामध्ये 20 किलो शेण व 200 ग्रॅम गूळ एकत्र करून जीवामृत तयार करून शेतकऱ्यांनी जैविक खते आपण स्वतः तयार करावी. जीवामृत वापरणे ही आत्ताच्या काळातील महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जीवामृत तयार करण्याकडे कल दिला पाहिजे.
यावेळी गोकुळ दूध संघाचे माजी संचालक युवराज पाटील (बापू), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, कागल पंचायत समितीचे उपसभापती डॉ इंद्रजित पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रविणसिंह भोसले, केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे, उसेद मुश्रीफ, नेताजी मोरे, दिनकर कोतेकर, राजेंद्र माने (सर), संताजी घोरपडे शुगरचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, शेती अधिकारी गोकुळ मगदूम, उसविकास अधिकारी उत्तम परिट आदी प्रमुख उपस्थित होते.
…………
करनूर ता. कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऊस शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे झालेल्या ऊस वाढीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत शिवारफेरी केली.





