Spread the news

कोल्हापूरात 6 जूनला ‘शिवाजी कोण होता?’चे भव्य सामूहिक वाचन
शिवराज्याभिषेक दिनी पाच हजार सजग वाचकांचा सहभाग

­

 

  •  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. 6 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता बिंदू चौक, कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे भव्य सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे. विविध जाती-धर्म, विचार आणि सामाजिक स्तरातील तब्बल पाच हजार सजग वाचक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती कोल्हापूर आणि सर्व परिवर्तनवादी व आंबेडकरवादी यांच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेतील मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक सलोखा, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार हा या सामूहिक वाचन उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा चिकित्सक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचावा, इतिहासाकडे तर्कशुद्ध आणि समतावादी नजरेतून पाहण्याची प्रेरणा मिळावी, तसेच समाजात वाढत चाललेल्या द्वेषमूलक वातावरणाला वैचारिक उत्तर मिळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी, धर्मनिरपेक्ष आणि प्रजाहितदक्ष विचार सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविणारे हे पुस्तक मानले जाते. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमात अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती, कोल्हापूर यांच्यासह मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि समस्त पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक चळवळींमधील कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत. समाजात बंधुता, समानता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी, तसेच युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध स्वयंसेवक आणि सामाजिक संघटनाही सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत.
हा उपक्रम केवळ सामूहिक वाचनापुरता मर्यादित नसून समाजात विवेकवादी विचारांची चळवळ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. इतिहासाचे चिकित्सक आकलन, सामाजिक एकात्मता आणि लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दृढ करणारा हा उपक्रम ठरणार असून शिवप्रेमी, आंबेडकरवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला उत्तमदादा कांबळे, पार्थ पोळके, दुर्वासबापू कदम, सुभाष देसाई, अनिल म्हमाने, सोमनाथ घोडेराव, रघुनाथ मांढरे, निलेश बनसोडे, जी. बी. अंबपकर, बाळासाहेब वाशीकर सुखदेव बुध्याळकर रमेश कांबळे, भिमराव कांबळे, बी. आर. कांबळे, दिपक कांबळे, संजय लोखंडे, विकी कांबळे, राजेंद्र ठिकपूरलीकर, जयसिंग पाडळीकर यांच्यासह विविध समविचारी पक्ष, संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपले विनित
उत्तमदादा कांबळे, डॉ. सुजित मिणचेकर
डी. जी. भास्कर, दुर्वासबापू कदम
सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले
पांडुरंग कांबळे, सोमनाथ घोडेराव
सुभाष रामुगडे, डॉ. अनिल माने
जयसिंग जाधव, रघुनाथ मांढरे
प्रेमानंद मौर्य, जी. बी. अंबपकर
डॉ. कपिल राजहंस, अनिल म्हमाने


Spread the news

You may also like

error: Content is protected !!