Spread the news

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शिवरायांचे धडे
AISSMS IOIT मध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्व व दुर्गअभियांत्रिकीवरील बहुविषयक अभ्यासक्रम

­

 

आज कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र, या आधुनिकतेच्या प्रवाहात नेतृत्व, दूरदृष्टी, नैतिकता, संसाधन व्यवस्थापन आणि राष्ट्रभान यांसारख्या मूल्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट वेगाने बदलणाऱ्या जगात या गुणांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील AISSMS Institute of Information Technology (IOIT) ने एक अभिनव पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या बहुविषयक शिक्षण संकल्पनेशी सुसंगत राहून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी “Leadership and Strategic Management: Lessons from Chhatrapati Shivaji Maharaj” आणि “Engineering Aspects of Fort Architecture in Maharashtra”* हे दोन multidisciplinary minor अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवाजी महाराजांवरील अभ्यासक्रम ही संकल्पना नाविन्यपूर्ण आहे. आधुनिक व्यवस्थापनशास्त्र, नेतृत्वविकास आणि शाश्वत अभियांत्रिकीची अनेक तत्त्वे शिवचरित्रात जिवंत स्वरूपात आढळतात. मर्यादित साधनसंपत्ती, प्रबळ शत्रू आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे व्यवस्थापन, नियोजन आणि नेतृत्वाचे जागतिक दर्जाचे उदाहरण मानले जाऊ शकते.

  •  

आज जगभरातील बिझनेस स्कूल्समध्ये संकट व्यवस्थापन, धोरणात्मक नियोजन, मनुष्यबळ विकास, माहिती संकलन आणि निर्णयप्रक्रियेचे धडे दिले जातात. शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला तर ही सर्व तत्त्वे त्यांच्या शासनकारभारात प्रभावीपणे वापरलेली दिसतात. त्यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ इतिहास शिकवत नाही, तर नेतृत्वाची व्यावहारिक तत्त्वे समजून घेण्याची संधी देतो.

दुसरीकडे महाराष्ट्रातील गड-किल्ले हे केवळ पर्यटनस्थळे किंवा ऐतिहासिक स्मारके नाहीत. ते तत्कालीन अभियांत्रिकी, भूगोल, संरक्षणशास्त्र आणि जलव्यवस्थापन यांचे उत्कृष्ट नमुने आहेत. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यांसारख्या किल्ल्यांची रचना पाहिली असता नैसर्गिक संसाधनांचा केलेला प्रभावी वापर, शाश्वत बांधकाम तत्त्वे आणि सुरक्षेचे वैज्ञानिक नियोजन स्पष्टपणे जाणवते. आधुनिक अभियंत्यांसाठी या वारशाचा अभ्यास प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरू शकतो.

या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Systems – IKS) यांच्याशी असलेली सांगड. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यावर भर देते. शिवाजी महाराजांचे जीवनकार्य हे प्रशासन, पर्यावरण व्यवस्थापन, लोकसहभाग, सुरक्षा आणि नेतृत्व यांचा समन्वय साधणारे भारतीय ज्ञानपरंपरेचे प्रभावी उदाहरण आहे.
AISSM संस्थेचा इतिहासही शिवकालीन मूल्यांशी आणि समाजाभिमुख शिक्षणाच्या परंपरेशी जोडलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाबरोबरच शिवरायांच्या विचारांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देणे ही केवळ शैक्षणिक गरज नसून काळाची मागणी आहे.
भविष्यातील अभियंते, उद्योजक आणि तंत्रज्ञ घडविताना त्यांच्यात तांत्रिक कौशल्यांसोबत नेतृत्व, नैतिकता, संघटनकौशल्य आणि राष्ट्रहिताची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. अशा वेळी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित बहुविषयक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान आणि भारतीय विचारपरंपरेचा संगम अनुभवण्याची संधी देतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ इतिहासाचे पान नाही; ते नेतृत्व, व्यवस्थापन, नवोन्मेष, शाश्वत विकास आणि राष्ट्रनिर्मितीचे जिवंत विद्यापीठ आहे. AISSMS IOIT चा हा उपक्रम त्या विद्यापीठाचे दरवाजे नव्या पिढीसाठी खुले करणारा ठरणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!