Spread the news

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध शिक्षणक्रमांची नवीन
अभ्यासकेंद्रे सुरू करण्यासाठी आवाहन
कोल्हापूर ( प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विविध शिक्षणक्रमांसाठी नवीन अभ्यासकेंद्र सुरू करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील पात्र शैक्षणिक संस्थांकडून दिनांक 15 जुलै, 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी -2020) नुसार आपल्या 13 विविध विद्याशाखांद्वारे पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र तसेच कौशल्याधारित 135 विविध शिक्षणक्रम विकसित केले असून यापैकी बहुतांश शिक्षणक्रमांना महाराष्ट्र शासनांची आणि विद्यापीठ आयोगाची मान्यता आहे.
मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीदास अनुसरून या विद्यापीठाची लोकविद्यापीठ होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू असून राज्यातील ग्रामीण भाग, वाडी – वस्तीवरील आणि शहरी – निमशहरी – महानगरातील गरजू विद्यार्थ्यांना याशिवाय समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकांसह महिला आणि मुलींना उच्च शिक्षणाची अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध शिक्षणक्रमांसाठी नवीन अभ्यासकेंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अभ्यासकेंद्र मान्यतेसंदर्भातील सविस्तर माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी नियत पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र शैक्षणिक संस्थांनी विद्यापीठाच्या https://ycmou.ac.in किंवा https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या पोर्टलद्वारे दि. 15 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कोल्हापूर विभागीय केंद्र अथवा विद्यार्थी सेवा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा.डॉ.प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
मान. कुलगुरू महोदयांनी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांनुसार गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ कटिबध्द असून ग्रामीण, दुर्गम तसेच वंचित भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी नवीन अभ्यासकेंद्रांची स्थापना महत्वाची आहे असे विदीत करून पात्र नामांकित शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा”, असे आवाहन केले आहे.
———————————————————————————————————————————

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!