*लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर*
कोल्हापूर दि. २२ : राज्यातील जनतेला दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू असून, आज या ठिकाणी भरविण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तर माजी उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचेआयोजन करण्यात आले होते याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . व्यासपीठावर महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड , पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे ,मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर,रविकांत अडसूळ उपायुक्त,करवीर तहसीलदार स्वप्निल पवार,जिल्हा भूमी अधीक्षक शिवाजी भोसले,सहा.आयुक्त स्वाती दुधाने,नगरसेवक शारंगधर देशमुख विजय जाधव, महेश जाधव,कौसर बागवान ,सत्यजित जाधव आदी उपस्थित होते.
आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच ‘रयतेचे राज्य’ स्थापन केले, जिथे जनतेचे कल्याण हेच सर्वोच्च ध्येय होते. शिवरायांच्या याच लोककल्याणकारी विचारांचा वारसा पुढे चालवत, आपल्या शासनाने या विशेष महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन केले आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे. जनतेच्या महसूल विभागाशी संबंधित कागदपत्रांच्या अडचणी एकाच छताखाली तात्काळ सोडवणे. नागरिकांना दाखले, शासकीय योजना आणि इतर सेवांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी प्रशासन स्वतः जनतेच्या दारात आले आहे. हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे.
देवेंद्रजींचा ‘प्रशासकीय सुशासनाचा ध्यास’ आणि स्वर्गीय अजितदादांची ‘कामाची वेगवान आणि शिस्तबद्ध पद्धत’, या दोन्ही गुणांचा मिलाफ आपल्याला या शिबिरात पाहायला मिळत आहे. हे शिबिर म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून, ती खऱ्या अर्थाने जनसेवा आहे. जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच या दोन्ही नेत्यांना त्यांच्या वाढदिवस आणि जयंतीनिमित्त दिलेली खरी आणि सर्वोत्तम भेट ठरेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे लोकाभिमुख तसेच विकासाभिमुख नेतृत्वामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक राज्यभरात होत आहे. त्यांचा वाढदिवस नेहमीच सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचावेत या हेतूने साजरा केला जातो, याच हेतूने राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आजचा उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कामाच्या पद्धती आणि त्यांचे माझ्यासोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि विरोधी पक्षात असलो तरीदेखील कार्यकर्ता जपणारं त्यांच नेतृत्व कायमच प्रेरणादायी ठरेल. भविष्यात लवकरच कोल्हापूरची हद्दवाढ होईल असे सांगून त्यांनी यावेळेस स्वर्गीय अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला .
सेवा – समाधान शिबिराचे येत्या 2 ऑगस्ट पर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे ठीक – ठिकाणी आयोजन सुरू राहील असे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी सांगितले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाराजस्व समाधान शिबीराच्या अनुषंगाने दुरदृष्यप्रणालीद्वारे आपला संदेश उपस्थितांना दिला.
जिल्ह्यातील प्रत्येक भूमि धारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे नियोजन केले जाईल असे शिवाजी भोसले यांनी सांगितले तर जिल्हा प्रशासन व मनपातर्फे या शिबिरात सुमारे 13 ते 14 हजार दाखले वाटपाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती करवीर प्रांतधिकारी मोसमी चौगुले यांनी प्रास्ताविकात दिली.
या शिबिरामध्ये कोल्हापूर महानगरपालिका, महसूल,महिला व बाल विकास,कामगार, जिल्हा उद्योग केंद्र,समाज कल्याण,नगर भूमापन, तहसीलदार संजय गांधी योजना तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयातर्फे जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर रूपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शारंगधर देशमुख,विजय जाधव यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महाराजस्व समाधान शिबिराला जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनपा उपायुक्त परितोष कंकाळ यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आदिल फरास, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, शिवसेना गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, महिला आणि बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान यांच्यासाह पात्र लाभार्थी, महायुतीचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.