आम्ही वर्षानुवर्षे सगळे नियम पाळतोय. नव्यांना काय अडचण आहे ?
गोकुळच्या जुन्या संस्थाचालकांचा नेत्यांना संतप्त सवाल
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संस्थेतील त्या 410 संस्थांना गोकुळ प्रशासन कडून नोटिसा जाताच त्या संस्थांचे सभासदत्व टिकेल की नाही याची चर्चा जोरदार रंगली आहे .संस्थांना नैसर्गिक न्याय प्रक्रिये द्वारे सभासदत्व टिकावे ही आमची देखील भूमिका आहे. पण काही उत्साही नेते मंडळी त्या संस्थांची सहनभूती मिळावी यासाठी चुकीची आश्वासने देऊन संघ प्रशासक यांच्या बद्दल डोकी भडकवण्याचे काम करत आहे.
मुळात ज्या एम. डी नी सभासदत्व दिले त्यांच्याच सहीने पुन्हा सभासदत्व रद्द का करू नये असा खुलासा मागवला याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाली आहे हे एम.डी व संघ प्रशासनाने मान्य केले आहे. सभासदत्व देताना संघ पोटनियम या लोकांना माहित न्हवते का ? त्यांच्या बरोबर एवढे मोठे जेष्ठ संचालक होते, त्यांना या नियमाचा विसर पडला होता का ? की त्यांनी या कडे सोयीस्कर रित्या डोळे झाक केली? हा आमचा प्रश्न आहे.
गेली साधारण 20 वर्षे आम्ही संघाचे पोटनियम पाळून सभासद आहोत. संस्था नोंदणी करण्यापासून ते आजपर्यंत आम्ही आणि आमच्यासारख्या अनेक संस्था या सर्व नियमांचा आदर ठेऊन कार्यरत आहेत. मग नवीन संस्थांना नियमांचे पालन करण्यासाठी काय अडचण आहे ? आणि जर नेत्यांना वाटत असेल की त्यांच्या चुकांवर पांघरून घालून ते सहानभूती मिळवत आहेत. तर अश्या नेत्यांनी लक्षात घेतलं की अश्याने तुम्ही आमच्यासारख्या नियमांचे पालन करणाऱ्या 3000 पेक्षा जास्त खऱ्या सभासदांची सहानुभूती गमावत आहात.
जर नेतेमंडळींना असं वाटत असेल की पोटनियम पालन न करणाऱ्या संस्था टिकल्या पाहिजेत. तर त्यांनी आमचेही सर्व नियम शिथिल करावेत. आम्हालाही नियमातून सूट द्यावी. खऱ्या अर्थाने आम्ही रोज लाखो लिटर दूध संकलित करून संघाला देतो. पण दुधासाठी आम्ही पाहिजे आणि मतांसाठी मात्र आमचा हक्क विभागण्यासाठी मतदार उभा करायचा , हे आम्ही खपवून घेऊ शकत नाही. त्यामुळे जर एखादी संस्था पोटनियमांचे पालन करत नसेल तर त्यावर योग्य कारवाई झालीच पाहिजे, अशी आम्हा सर्व जुन्या सभासदांची भूमिका आहे.
आता नियम मोडले तर उद्या प्रत्येक जण याच पद्धतीने सभासदत्व मिळवून मताची बेरीज करून ठेवेल व ही पद्धत संघहिताच्या दृष्टीने घातक आहे त्यामुळे म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावायला नको ही आमची माफक अपेक्षा आहे. आमच्यासारख्या जुन्या 3600 संस्थानी हे सगळे संघ नियम आजवर पाळले आहेत. त्यामुळे खोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये. अश्या संस्थांना राजकीय संरक्षण पुरवणाऱ्याना आम्हीसुद्धा एकजुटीने मतदानातून ताकत दाखवून देऊ.
श्री विठ्ठल रखुमाई सह दूध संस्था, मर्या, करंजीवणे
चेअरमन :- सुधिर अर्जून मसवेकर
ता:- कागल
जि:-कोल्हापूर
स्थापना :- 1991




