*घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते*
*मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन*
*शहरातील सर्वच बेघरांना घरकुले देण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध*
*राजे समरजितसिंह घाटगे यांची ग्वाही*
कागल, दि. २६:
बेघराना मिळालेल्या घरकुलामुळे त्या कुटुंबांचे केवळ एक घर होत नाही. तो परिसर स्वच्छ राहतो, मुलांवर चांगले संस्कार होतात. एकूणच त्या कुटुंबाचे जीवनमान आणि राहणीमानही उंचावते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहरातील सर्वच गरजू बेघरांना हक्काची घरकुले देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
कागल शहरातील वड्डवाडी येथे बेघरांना ७० घरकुले प्रदान कार्यक्रमात श्री. मुश्रीफ व श्री. घाटगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी कागल नगरपालिकेच्या नव्याने बांधलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे ‘स्वर्गीय अजितदादा पवार जलशुद्धीकरण केंद्र’ असा नामकरण समारंभ झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत फिल्टर हाऊस ते बोटिंग क्लब परिसर व कागल शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा सोहळा संपन्न झाला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आमदार निधीतून रु. २५ लाख खर्चाच्या ६० सोलर दिव्यांचे उद्घाटन, असे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाले.
मंत्री श्री मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, नगरपालिकेने सर्वे करून अजूनही किती लोकांना घरांची गरज आहे, याचा अहवाल तयार करावा. मी आणि समरजितसिंह घाटगे मिळून प्रयत्न आणि पाठपुरावा करून पुन्हा नव्याने ३००० घरकुले बांधू. त्यासाठी पाच एकर जागा आरक्षित आहे आणि त्याचा आराखडाही तयार केलेला आहे. अशा घरकुलांमधून त्या कुटुंबांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांची मुलं-बाळं मोठी व्हावीत, त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, अशी प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी करतो. श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रतिष्ठापना केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार येणार आहेत. त्यावेळी न भूतो न भविष्यती असा दिमाखदार कार्यक्रम करूया.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, २०१२ मध्ये स्वर्गीय राजेसाहेब व श्री. मुश्रीफसाहेब यांची युती होती. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत पहिला घरकुलचा कार्यक्रम झाला होता . त्यानंतर आज १४ वर्षांनी आम्ही एकत्र आलो आहोत आणि या घरकुलांच्या चौथ्या टप्प्याचे वाटप या ठिकाणी होत आहे. गरजू लोकांना घरकुल मिळाले पाहिजे . भाड्याने अथवा या घरकुलाची विक्री करू नये. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत .
*विकासातूनच उत्तर……!*
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मी व मुश्रीफसाहेब एकत्र आल्यानंतर बऱ्याच लोकांनी टीका केली. मात्र; आम्ही त्यांना उत्तर दिले नाही. पण, आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे जी विकासकामे होत आहेत, यातूनच जे टीका करत होते त्यांना उत्तर मिळत आहे .
*मुहूर्त बघत बसू नका……!*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची आहे. ती कोणाची खाजगी मालमत्ता नाही. दहा वर्षांपूर्वी आम्ही संचालक मंडळात गेलो, त्यावेळी या बँकेच्या ठेवी २,००० कोटी, तोटा १०० कोटी, एनपीएही भरपूर होता. आजघडीला रू. १३,००० कोटी ठेवी, रू. ३०० कोटी नफा व एनपीए शून्य टक्के आहे. असे सगळे मापदंड चांगले आहेत. असे असताना आमदार शिवाजीराव पाटील लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी बोलतानासुद्धा आपली भाषा आवरावी. त्यांनी म्हटले आहे की, कागदपत्रे माझ्याकडे आहेत, सगळी कागदपत्रे मी उघड करणार आहे. आमदार श्री. पाटीलसाहेबांना या निमित्ताने मी विनंती करतो, की मुहूर्त बघू नका. जिल्हा बँकेचे तुम्हाला चुकीचे काय वाटत असेल ते दाखवण्याचे काम तुम्हाला करावे लागेल. उगाच लोकांची दिशाभूल करण्याची भूमिका घेवू नका. श्री भैय्या माने पुढे म्हणाले, त्यांना मी असेही आवाहन करतो, गडहिंग्लज साखर कारखाना बंद पडलेला होता. हजारो लोक बेरोजगार झाली. शेतकऱ्यांचा ऊस जाईना. आजरा साखर कारखाना बंद पडायला आलेला होता. त्यावेळी तुम्ही गेला होता?
*जनतेवर माझा विश्वास……!*
श्री. माने यांच्या आमदार श्री. पाटील यांच्या संदर्भातील वक्तव्याचा धागा पकडत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वास्तविक भैय्या माने यांनी अशा व्यक्तीची दखल घेण्याची आवश्यकताच नाही. त्यांना बेदखलच केले पाहिजे. कारण; जनता सब जानती है. लोक हे सगळं अत्यंत बारकाईने बघत असतात. लोकांना खरं काय आणि खोटं काय, हे कळत असतं. जनतेवर माझा विश्वास आहे.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, सौरभ पाटील, दीक मगर, अरुण गुरव, संजय चितारी, अजितसिंह घाटगे, मारुती मदारे, नगरसेविका सारिका बारड, नवाज मुश्रीफ, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते .
स्वागत गटनेते सतीश घाडगे यांनी केले. प्रास्ताविक आरोग्य सभापती प्रवीण काळबर यांनी केले. आभार नगरसेविका सारिका बारड यांनी मानले .
………..
*कागल: शहरातील बेघरांना घरकुलांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे व उपस्थित नागरिक.*
===========




