जागतिक युवा कौशल्य दिन व आषाढी एकादशी निमित्त प्रथम स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम

Spread the news

जागतिक युवा कौशल्य दिन व आषाढी एकादशी निमित्त प्रथम स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम

­

 

कोल्हापूर : जागतिक युवा कौशल्य दिन तसेच पवित्र आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षप्रेमी संस्था व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर, कोल्हापूर येथील इलेक्ट्रिकल स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, संभाजीनगर कोल्हापूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण व पर्यावरणपूरक वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  •  

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, वृक्षांचे महत्त्व पटवून देणे तसेच “झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हा होता. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने युवकांमध्ये कौशल्य विकासासोबतच सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमात मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षसंवर्धन हे केवळ एक उपक्रम नसून ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या उपक्रमात ताम्हण (महाराष्ट्राचे राज्यपुष्प), कडुलिंब, मुचकुंद, सोनचाफा, करंज, बकुळ, आकाशनिंब व कांचन यांसारख्या औषधी, छायादार व पर्यावरणपूरक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी वृक्षांचे जतन, पाणी व्यवस्थापन व नियमित देखभाल करण्याची सामूहिक शपथही सर्व उपस्थितांनी घेतली.

कार्यक्रमात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तर्फे सुधाकर भदरगे (महाराष्ट्र राज्य प्रमुख), आसमा पठाण (कोल्हापूर विभाग प्रमुख), वैशाली कोळी (इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख), रामचंद्र शिंदे, अजिम बागवान, अमोल बुढे, अमर पोवार, महादेव मोरे उपस्थित होते. तसेच वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष संतोष औंधकर, दीपक गायकवाड, शिवम जाधव, मिलिंद पाटील, अक्षय कांबळे, साजिद शेख, रुद्र देवकर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन भविष्यात अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप “हरित कोल्हापूर – स्वच्छ कोल्हापूर” या संकल्पनेच्या घोषणांनी करण्यात आला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!