📍डी. वाय.दादा होण, लईच अवघड आहे …..
हे माझे मत..डॉ.महादेव नरके
📌खालील लेख विजय चोरमारे ज्येष्ठ संपादक यांच्या फेसबुक वॉल वरुन साभार…….
स्कूटरवरून नव्हे, डीवाय पाटील मोटारसायकलवरून फिरत होते !
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासंदर्भात जे विधान केले आहे, त्यात काहीही चुकीचे नाही. डी. वाय. पाटील एकेकाळी स्कूटरवरून फिरत होते, असं चंद्रकांतदादा म्हणाले. आता स्कूटरचं माहित नाही, पण ते मोटारसायकलवरून फिरत होते याची नोंद आहे. एवढंच नाही तर भाऊसिंगजी रोडवर काखेत बॅग मारून पायी चालत असतानाही त्यांना बघितल्याचं काहीजण सांगतात.
आणखी एक गोष्ट मुद्दाम सांगायला हवी. डीवाय पाटील गेले त्यावेळी केलेल्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलाय. एक काळ असा होता की, डी. वाय. पाटील यांनी कर्ज काढलं नाही, अशी कोल्हापुरातील एकही बँक किंवा पतसंस्था शिल्लक नव्हती. एकेकाळच्या त्यांच्या या परिस्थितीची हेटाळणी करायची की, अशा कठिण परिस्थितीवर मात करीत, प्रचंड संघर्ष करून एका शेतक-याच्या मुलानं उभारलेल्या शैक्षणिक साम्राज्याचं कौतुक करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
डी. वाय. पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेऊया.
डी. वाय. पाटील म्हणजे ज्ञानदेव पाटील यांचे वडिल यशवंतराव पाटील हे सधन शेतकरी होते. त्यांचं शिक्षण चौथीपर्यंत झालं होतं. पण मोठमोठ्या लोकांशी त्यांची मैत्री होती. काकासाहेब गाडगीळ, वसंतदादा पाटील, प्राचार्य एम. आर. देसाई, बॅरिस्टर खर्डेकर अशा माणसांशी त्यांचा दोस्ताना होता.
कसबा बावड्यात प्राथमिक शिक्षणाची सोय होती. हायस्कूल नव्हतं. यशवंतराव पाटलांनी प्राचार्य एम. आर. देसाईंचा सल्ला घेतला. कसबा बावडा शिक्षण मंडळ नावाची संस्था स्थापन करून त्यांच्यामार्फत छत्रपती राजाराम हायस्कूल सुरू केलं.
स्वातंत्र्यचळवळीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी क्रांतिकारकांना ते मदत करायचे. वसंतदादा पाटील भूमिगत असताना सहका-यांसह त्यांच्या शेतातील खोपीत चार दिवस राहिले होते. चार दिवसांनी दादा निघाले, तेव्हा यशवंतराव पाटलांनी वसंतदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कपड्यांचा आहेर केला. तुम्ही देशासाठी थोर कार्य करताय म्हणून त्यांच्या कार्यासाठी चांदीचे एक हजार रुपये दिले. नंतर खूप वर्षांनी वसंतदादा पाटील यांनीच डीवाय पाटील यांना ही हकीकत सांगितली होती.
एनटी सरनाईक हे यशवंतराव पाटील यांचे जिवलग स्नेही होते. सरनाईक यांच्या राजकीय जडणघडणीत यशवंतराव पाटलांचा मोठा वाटा होता. १९४६ मध्ये करवीर तालुका शेतकरी संघ स्थापन केला, त्यामध्ये एनटी सरनाईक यांना यशवंतराव पाटील यांची साथ होती. सरनाईक यांच्या राजकीय कारकीर्दीच्या जडणघडणीतही यशवंतराव पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले. आनंदराव पाटील चुयेकर यांच्याबरोबर गोकुळच्या स्थापनेचं श्रेय ज्यांना दिलं जातं तेच हे एनटी सरनाईक.
डीवाय पाटील स्कूटरवरून फिरत होते की नाही ठाऊक नाही, पण तरुणपणी त्यांना मोटारसायकल चालवण्याचा भलता शौक होता. ते प्रचंड वेगात मोटारसायकल चालवायचे. बीएसए गोल्डन फ्लॅश ही साडेसहा हॉर्सपॉवरची मोटारसायकल त्यांच्याकडं होती. १९५६ साली ते मोटारसायकलवरून कोल्हापूरहून दिल्लीला जाऊन आले होते. यावरून त्यांच्या मोटारसायकलच्या वेडाची आणि वेगाची कल्पना येऊ शकते.
१९६२ साली कोल्हापूरच्या तत्कालीन राजकारणात डी.वाय. पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मळाली नाही. त्यामुळं ते कमालीचे निराश झाले. खिन्न अवस्थेत दुःखी मनाने मुंबईहून कोल्हापूरला परत आले. घरी आल्यावर असेच काहीबाही शोधत घरातली एक लाकडाची पेटी उघडली. त्यात काकासाहेब गाडगीळ यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेले पत्र सापडले. अल्लाउद्दीनला जादूचा चिराग सापडल्यावर व्हावा, तसा आनंद त्यांना झाला. काकासाहेब तेव्हा चंदीगडचे गव्हर्नर होते. ते मंत्री असताना कोल्हापूरला आले की यशवंतराव पाटील यांच्या वाड्यावर राहायला यायचे. सर्किट हाऊसवर कधीच जायचे नाहीत. डीवाय पाटील वडिलांसह पुण्याला गेले की काकासाहेबांच्याकडे उतरायचे. एवढा घरोबा होता. त्या मैत्रीच्या जिव्हाळ्यातूनच त्यांनी डीवाय पाटील यांच्या वडिलांना लिहिलेले ते पत्र होते.
निराश अवस्थेत असलेल्या डीवाय पाटील यांच्या मनाला काकासाहेबांच्या त्या पत्राने उभारी दिली. त्यांनी ताबडतोब चंदीगडला जाण्याचा निर्णय घेतला. गाडी काढली. मुंबईला आले. शेतकरी संघाच्या गेस्ट हाऊसवर गाडी ठेवली. मुंबई-दिल्ली १८० रुपये विमानाचे तिकिट होतं. दिल्ली गाठली. दिल्लीहून टॅक्सीने चंदीगड. तडक राजभवनावर.
राज्यपाल काकासाहेब गाडगीळांकडे चिठ्ठी पाठवून दिली, ‘डीवाय पाटील, सन ऑफ यशवंतराव पाटील.’
चिठ्ठी आत जाताच काकासाहेब स्वतः डीवाय पाटील यांना घ्यायला बाहेर आले. हसतमुखानं स्वागत केलं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. आपल्या घरचेच कुणी आल्यासारखी आत्मीयता त्यांच्या चेह-यावर होती. डीवाय पाटील यांना त्यांनी प्रेमानं पोटाशी धरलं. त्यांच्या कक्षात गेल्यानंतर खुर्चीत बसत असतानाच त्यांनी, आधी न कळवता असं अचानक येण्याचं कारण विचारलं. सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. डीवाय पाटील त्यांना म्हणाले, , ‘मला तिकीट मिळालं नाही. तुम्ही नेहरूंना सांगितलं तर काम होईल.’
काकासाहेब लगेच तयार झाले. चला दिल्लीला निघूया म्हणाले. अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि आपण दिल्लीला जात असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांना सूचना देत देतच त्यांच्या कक्षातून बाहेर पडून दोघे गाडीत बसले. मैत्रीची जाणीव ठेवून एक राज्यपाल मित्राच्या मुलासाठी दिल्लीला निघाले होते. एखाद्याने, बरं मी सांगतो, प्रयत्न करतो वगैरे सांगून वाटेला लावले असते. फारतर नेहरूंच्या पीएला फोन लावून बघा काहीतरी करा वगैरे सांगितलं असतं. पण काकासाहेब वेगळे होते. वडिलांनी मुलाच्या मनातली तगमग ओळखावी तसे त्यांनी डीवाय पाटील यांचे मन वाचले होते. म्हणून तर जराही वेळ न दवडता दिल्लीला निघाले. दोघे थेट नेहरूंच्या निवासस्थानी तीनमूर्तीला पोहोचले. काकासाहेब गव्हर्नर असल्यामुळे वाटेत कुठे कुणी अडवण्याचा प्रश्न नव्हता.
हाय हॅलो झाले. काकासाहेबांनी डीवाय पाटील यांची नेहरूंना ओळख करून दिली. माझ्या जिवलग मित्राचा मुलगा असल्याचं सांगितलं. येण्याचं कारणही सांगितलं.
एम. ओ. मथाई नेहरूंचे सेक्रेटरी होते. त्यांना नेहरूंनी महाराष्ट्राची यादी घेऊन यायला सांगितलं.
यादी आल्यानंतर नेहरू म्हणाले, ‘आय वाँट टू मेक वन चेंज…’
त्यावर मथाई म्हणाले, ‘यादी पीटीआयला पाठवली आहे.’
नेहरूंच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले दिसले. आपण काकासाहेबांचे काम करू शकत नाही, याचे त्यांना वाईट वाटले.
नेहरू म्हणाले, ‘यादी पीटीआयला गेली आहे, त्यामुळे आता बदल करणे योग्य दिसणार नाही.’
मग डीवाय पाटील यांच्याकडं वळून नेहरू म्हणाले, ‘आय विल डेफिनेटली कन्सिडर युवर क्लेम नेक्स्ट टाईम. यू आर क्वाईट यंग, फाइव्ह इअर्स आर नथिंग…’
उमेदवारी न मिळाल्यामुळं डी वाय पाटील यांच्या मनावर निराशेचं मळभ दाटलं होतं, पण काकासाहेबांच्या मायेमुळं आधीच ते सुखावले होते. नेहरूंच्या या भेटीनं मनावरचं निराशेचं मळभ कुठल्या कुठे पळालं. स्वच्छ, प्रसन्न मनाने कोल्हापूरला परत आले.
तर डीवाय पाटील यांची आणि त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसं आहे.
डीवाय पाटील हे भारतीय राजकारणातलं दुर्मिळ व्यक्तिमत्त्व आहे. एरव्ही राजकारणी व्यक्तीचे करिअर पन्नाशीत सुरू होते, अलीकडे तर ते साठीपर्यंत पोहोचलेय. परंतु राजकारणातील बजबजपुरीला कंटाळून वयाच्या ४५ व्या वर्षी डीवाय पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. व्यक्तिशः काँग्रेसच्या विचारांशी बांधिलकी मानून आयुष्यभर काम केलं, मात्र सर्व पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले.
अशा ऋषितुल्य व्यक्तीला त्यांच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यातच राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झाला नसता तर बरं झालं असतं.



