विजय टिपुगडे यांच्या चित्रांचे ‘तरंगायन’ प्रदर्शन उद्यापासून सृजनशील प्रवास, दोनशेहून अधिक कलाकृतींचा समावेश

Spread the news

विजय टिपुगडे यांच्या
चित्रांचे ‘तरंगायन’ प्रदर्शन उद्यापासून
सृजनशील प्रवास, दोनशेहून अधिक कलाकृतींचा समावेश
कोल्हापूर, दि. ११ ः येथील प्रसिध्द चित्रकार विजय टिपुगडे यांच्या निसर्गचित्रांच्या ‘तरंगायन’ प्रदर्शनाला शनिवार (ता.१४) पासून प्रारंभ होणार आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनातील मोठ्या कलादालनात प्रदर्शन होत असून दोनशेहून अधिक कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश आहे.
दरम्यान, शनिवारी (ता.१४) सकाळी अकरा वाजता खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, सत्यजित कदम, पुष्कराज क्षीरसागर, डॉ. सुरज पवार, डॉ. रेश्मा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होईल.
चित्रकलेच्या इतिहासात निसर्ग हा प्राचीन काळापासून चित्रकारांच्या अभिव्यक्तीचा महत्त्वाचा विषय राहिला आहे. निसर्गचित्रणाच्या परंपरेला आपल्या वास्तववादी शैलीतून वेगळे रूप देणारे चित्रकार म्हणून श्री.टिपुगडे यांची ओळख आहे.
‘तरंगायन’ म्हणजे तीन दशकांपासून कलेला पूर्णपणे समर्पित असलेल्या एका सच्च्या कलावंताचा सृजनशील प्रवाह आहे. ज्याप्रमाणे एखादी लाट आपला वेग आणि प्रवाह कायम ठेवत किनाऱ्याच्या रचनेनुसार नवे आकार धारण करते आणि आपले ध्येय गाठते, त्याचप्रमाणे श्री. टिपुगडे यांचा कलाप्रवासही एका कलामाध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे सातत्याने प्रवाहित होत राहिला आहे. ‘कामातील बदल हीच खरी विश्रांती’ हे तत्त्व आत्मसात करून त्यांनी केवळ चित्रकार म्हणून नव्हे, तर कलाशिक्षक, रंगावलीकार, सामाजिक कार्यकर्ता, छायाचित्रकार आणि स्तंभलेखक अशा विविध भूमिका नेटाने बजावल्या आहेत. तब्बल १२ वर्षांनंतर त्यांचे वैयक्तिक निसर्गचित्र प्रदर्शन रसिकांच्या भेटीला येत आहे. या प्रदर्शनात जलरंग आणि ॲक्रेलिक या माध्यमांतील कलाकृती असून कोल्हापूरच्या निसर्गरूपाचे, परिसरातील दृश्यवैभवाचे आणि निसर्गातील सूक्ष्म बारकाव्यांचे वास्तववादी शैलीतील चित्रण अनुभवता येणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!