*डॉ. दिग्विजय पवार यांचा मलेशियात आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव*
*_लिंकन विद्यापीठात संशोधन सहमार्गदर्शकपदी नियुक्ती_*
कोल्हापूर: शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक नेतृत्वाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागप्रमुख आणि जनसंपर्क अधिकारी प्रा. डॉ. दिग्विजय जोतीराम पवार यांना मलेशियामध्ये युनिव्हर्सिटी क्वालालंपूरच्या वतीने ‘आउटस्टँडिंग अकॅडेमिशियन अवॉर्ड २०२६’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये पदव्युत्तर संशोधन सहमार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
मलेशियातील मेलाका येथे युनिव्हर्सिटी क्वालालंपूरच्या मलेशियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल अँड बायोइंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी येथे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एसडीजी-ड्रिव्हन इनोव्हेशन अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनिव्हर्सिटी क्वालालंपूरच्या कॅम्पस प्रमुख, अधिष्ठाता डॉ. नूर आयना बिन्ती मोहम्मद नाझरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या परिषदेचे सहआयोजक पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने हे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पवार यांना १७ वर्षांचा अध्यापन व शैक्षणिक प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून यापूर्वी अभियांत्रिकी पदविका शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांची दोन पुस्तके, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद व नियतकालिकांमध्ये ३५ हून अधिक संशोधन लेख आणि ६ पेटंट प्रसिद्ध झाले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांसाठी समीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. मशीन लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, एम्बेडेड सिस्टिम्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने डोळ्यांतील काचबिंदूचे निदान यांसारख्या विषयांवर त्यांचे संशोधन केंद्रित आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षणरत्न पुरस्कार २०२४’ देऊन गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, डॉ. पवार यांची मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या सेंटर ऑफ पोस्टग्रॅज्युएट स्टडीजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विषयासाठी संशोधन सहमार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पदव्युत्तर संशोधकांना मार्गदर्शन, संशोधन प्रकल्पांचे शैक्षणिक पर्यवेक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन सहकार्यामध्ये योगदान देण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. याचबरोबर डॉ. पवार हे लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज, मलेशिया येथे लिंकन ग्लोबल पोस्टडॉक्टोरल रिसर्चर म्हणूनही कार्यरत आहेत.
*फोटो ओळ -* मलेशियातील युनिव्हर्सिटी क्वालालंपूरच्या वतीने ‘आउटस्टँडिंग अकॅडेमिशियन ॲवॉर्ड २०२६’ स्वीकारताना अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे जनसंपर्क अधिकारी आणि ईटीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिग्विजय पवार.



