श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संकुलात ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

Spread the news

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संकुलात
ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

­

 

कोल्हापूर दि.30 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात, संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या कन्या आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांच्या मातोश्री, संस्थेच्या दिवंगत सचिवा, स्वर्गीय ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न झाले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला अभ्यास केंद्र, महिला सक्षमीकरण कक्ष (सचेतना मंडळ), अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारांचा वारसा जपणाऱ्या ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगीताई गावडे यांचे कार्य व जीवनप्रवास” या विषयावरील छायाचित्र प्रदर्शन तसेच भारती विद्यापीठाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणा़त प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत प्रशासनासोबत ममत्व आणि मातृत्वही प्राचार्य शुभांगीताई गावडे यांनी पेरले. प्रशासक म्हणून त्यांनी संस्थेला दिशा दिली, तर आईच्या मायेने शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आपलेसे केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. श्रद्धा जाधव यांनी उपस्थितांना महिला सक्षमीकरणाची शपथ दिली. समाजात स्त्री-पुरुष समानता, महिलांचा सन्मान, सुरक्षितता, स्वावलंबन आणि संवेदनशीलतेची मूल्ये जपण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.
यावेळी ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. शिल्पा भोसले यांनी आपल्या मनोगतात ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगीताई गावडे यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साधेपणा, सेवाभावी वृत्ती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा उल्लेख केला. ज्युनिअर विभागाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका प्रा. गीतांजली साळुंखे यांनीही शुभांगीताई गावडे यांच्या बालपणापासून ते संस्थेच्या कुशल प्रशासक म्हणून केलेल्या कार्याचा भावपूर्ण आढावा घेत त्यांच्या नेतृत्वगुणांचे, शिस्तप्रियतेचे आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले.
यावेळी शुभांगीताई गावडे यांच्या जीवनातील विविध टप्पे, शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय व सेवाभावी कार्याचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. तसेच भारती विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
याप्रसंगी संस्थेच्या सचिवा, स्वर्गीय ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या 54 व्या जयंतीनिमित्त विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आणि दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने माले, हातकणंगले येथे 500 झाडांचे वृक्षारोपण मा. मुरलीधर गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच श्री राहुल कुंभार, उपसरपंच श्री. संतोष खोत, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रताप ऊर्फ बंटी पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन श्री हितेंद्र साळुंखे, संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. हितेश रानिंगा, प्राचार्य धनराज भोसले, श्री निलेश साळुंखे, श्री. महेश साळुंखे, श्री सिद्धेश साळुंखे, प्रा डॉ. अजिंक्य पत्रावळे, डॉ. सुनील भोसले, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. निलेश जाधव आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
याप्रसंगी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरातील लोकमान्य विद्यालय, मिलिंद हायस्कूल, सरस्वती चुनेकर हायस्कूल, आर.के.वालावलकर हायस्कूल, श्री राम विद्यालय या शाळांमध्ये संस्थेच्या वतीने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते व संस्थापक, मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजच्या वतीने साडी वाटप व प्राचार्या सौ शुभांगीताई गावडे यांच्या कार्याचा आढावा घेणारे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना, दीप प्रज्वलन व ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे़ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराकटे, डॉ. मृणालिनी देसाई यांनी केले. याप्रसंगी वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सी. बी. पाटील, प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर, प्रा. मयुरी पाटील, प्रा. पल्लवी देसाई पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………………………………………………………………………………………………..

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!