कोल्हापूरच्या मूर्तिकलेचा गौरवशाली वारसा कुंभार समाजाने जपला : राजे समरजितसिंह घाटगे बापट कॅम्पमधील मूर्तिकारांशी साधला संवाद

Spread the news

*कोल्हापूरच्या मूर्तिकलेचा गौरवशाली वारसा कुंभार समाजाने जपला : राजे समरजितसिंह घाटगे

­

 

*बापट कॅम्पमधील मूर्तिकारांशी साधला संवाद*
कोल्हापूर, प्रतिनिधी :

  •  

कलाकारांची खाण म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयामुळे नवी उभारी मिळाली असून, हा गौरवशाली वारसा कुंभार समाजाने आपल्या अप्रतिम मूर्तिकलेच्या माध्यमातून जतन केला आहे, असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
बापट कॅम्प परिसरातील विविध मूर्तिकारांच्या कार्यशाळांना भेट देऊन मूर्ती निर्मितीची पाहणी तसेच कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी येथे कुंभार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूर्ती निर्मितीची प्रक्रिया, पारंपरिक मातीकला आणि कलाकारांचे कौशल्य जाणून घेतले. व्यवसायासमोरील अडचणी, कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठ, आर्थिक प्रश्न आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
श्री घाटगे पुढे म्हणाले, कुंभार समाजाने पिढ्यान् पिढ्या संस्कृतीचा अमूल्य वारसा जपला आहे. कोल्हापुरातील गणेशमूर्तींना देश-विदेशातून मोठी मागणी असते. हा परंपरागत व्यवसाय टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, व्यापक बाजारपेठ आणि शासनाच्या योजनांची जोड आवश्यक असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण निश्चितपणे प्रयत्नशील राहू.
यावेळी ज्येष्ठ चित्रकार गणपत माजगावकर यांचा राज्य शासनाच्या मानपत्राबद्दल घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगरसेवक प्रमोद देसाई, स्वरूप कदम, वैभव माने,विजयेंद्र माने,राजनंदिनी महाडिक, वंदना मोहिते, सोसायटीच्या अध्यक्षा सुरेखा माजगावकर, संचालक अभिजीत कुंभार, मारुतराव कातवरे, प्रकाश तारळेकर, प्रकाश सरवडेकर, किरण माजगावकर, प्रमोद कुंभार, सुदर्शन माजगावकर यांच्यासह कुंभार समाजातील पदाधिकारी व मूर्तिकार उपस्थित होते.

चौकट
*वर्ग-दोनचे प्लॉट वर्ग-एकमध्ये करण्यासाठी समरजितसिंह घाटगेंची पाठपुराव्याची ग्वाही*

राज्य शासनाने सुमारे ५९ वर्षांपूर्वी बापट कॅम्प परिसरातील साडेएकोणतीस एकर जमीन कुंभार समाजाला व्यवसाय व निवासासाठी दिली. या जागेचे वाटप करण्यात आले आहे. मात्र प्लॉट वर्ग-दोनमध्ये असल्याने कर्ज, हस्तांतरण आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत. यासाठीचा नगरसेवक विजेंद्र माने यांच्या पुढाकाराने केलेला प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यास गती देऊन हे प्लॉट वर्ग-एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी समाजाने राजे समरजितसिंह घाटगे यांच्याकडे पाठपुराव्याची मागणी केली. स्थानिक नगरसेवकांसह महसूल मंत्री तसेच आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांकडेही हा विषय प्रभावीपणे मांडू, असे आश्वासन घाटगे यांनी दिले.

छायाचित्र बापट कॅम्प येथे कुंभार बांधवांशी संवाद साधताना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!