माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the news

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : हिंदुराव हुजरे-पाटील
आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

­

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जात, धर्म टोकदार होण्याच्या काळात फक्त पुस्तकी शिक्षण न देता पूर्वापार चालत आलेल्या परंपरावादी माणूसपणाला बंदिस्त करू पाहणाऱ्या सर्व गुलामी लागणार्‍या चौकटी मोडून टाकणे, त्यांना संवादी करत मानवतावादी बनविण्यासाठी आजच्या शिक्षकांची मूलभूत जबाबदारी घ्यावी असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी केले.
ते सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून सामाजिक भान जपत भरीव योगदान देऊन शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटविणारे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांना इंडियन टीचर्स फोरमचा नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.
इंडियन टीचर्स फोरमचे प्रमुख व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. डी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभात प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, लेखक व विचारवंत डॉ. श्रीपाद देसाई, लेखिका डॉ. शोभा चाळके, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर, ॲड. करुणा विमल आणि इंडियन टीचर्स फोरमचे मोहन मिणचेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
पुरस्काराला उत्तर देतांना आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, आज राजकारणात मनमानी चालू आहे. राज्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे गरजेचे आहे. देश संविधानावर चालला पाहिजे. भयमुक्त शिक्षण मिळणे गरजेचे आहे. शिक्षणात संविधान मूल्य रुजवली पाहिजेत. सध्या मुलांच्यावर शिक्षकांनी मानवहिताचे, सामाजिक भान राखणारे योग्य संस्कार करणे गरजेचे आहे. या पुरस्काराचे माझी जबाबदारी वाढवली आहे. मी सदैव विद्यार्थी आणि शिक्षकाच्या हितांच्या भूमिका घेईल.
डॉ. हरीश भालेराव म्हणाले, शिक्षण क्षेत्रात सामाजिक भान निर्माण होणे गरजेचे आहे. आजच्या शिक्षणात व्यापक कल्याणकारी तत्त्वज्ञान रुजवण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी देशाचे वाटोळे केले आहे. राजकारणात आज प्रामाणिकपणा राहिला नाही. जाती-जातीत भांडणे लावली जात आहेत. संविधानाची मोडतोड सुरू आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला देश, समाज भय व शोषणमुक्त बनवला पाहिजे.
हिंदुराव हुजरे-पाटील यांनी यावेळी सामाजिक कार्यासाठी निर्मिती विचारमंचला पन्नास हजार रुपयांची मदत केली.
प्रा. विक्रम कदम, शिकंदर बेलोशे, चंद्रकांत कासार, स्वाती लोखंडे, दशरथ जाधव, सतिश घुगरे, मनिषा गावडे, डॉ. रेखा गोरे, मयुरी जंत्रे, रवींद्र सूर्यवंशी यांना यावेळी नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वागत सुरेश केसरकर यांनी प्रास्ताविक डॉ. डी. श्रीकांत यांनी तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी केले. आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.

  •  

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!