*संघर्षातून उभे राहिलेले, सत्तेचा उपयोग समाजासाठी करणारे संवेदनशील नेतृत्व : चंद्रकांतदादा पाटील*
गिरणी कामगाराच्या घरात जन्म घेऊन प्रचंड गरिबी आणि संघर्ष जवळून अनुभवलेले आणि गेल्या 45 वर्षांपासून विद्यार्थी चळवळ, संघटनात्मक कार्य, सक्रिय राजकारण आणि समाजजीवनात योगदान देणाऱ्या चंद्रकांतदादांचा प्रवास हा संघर्ष, समर्पण आणि समाजसेवेचा प्रवास आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करताना त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला. राजकारणात प्रवेश केल्यानंतरही केवळ राजकारण करण्यापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. दादांनी आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढविल्या आहेत, त्या सर्वांमध्ये विजय संपादन केला आहे.
दादांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची संवेदनशीलता! ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे’ या विचाराचा खऱ्या अर्थाने प्रत्यय त्यांच्या वागण्यातून येतो. एखाद्या व्यक्तीचे दुःख समजून घेणे, अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे आणि शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, ही त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.
आजपर्यंत त्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या संघटनकौशल्याचे आणि जनसंपर्काचे प्रतीक आहे. मात्र, दादांचे मोठेपण केवळ निवडणुका जिंकण्यात नाही, तर मिळालेल्या सत्तेचा उपयोग समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आहे. मंत्रिपद हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी वापरायचे असते, ही भूमिका त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभा करण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा उपयोग केला, ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे. सत्तेचा उपयोग करून अनेक नेत्यांनी स्वतःचे उद्योगधंदे उभा केले. पण दादांनी असे कोणतेच उद्योग उभा केले नाहीत, हे त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींच्या मोफत शिक्षणाचा त्यांनी घेतलेला निर्णय हा अनेक मुलींच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारा ठरला आहे. शिक्षण, सामाजिक विकास, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या व्यापक सामाजिक दृष्टिकोनाची साक्ष देते.
दादांबद्दल बोलताना माझ्या मनातील भावना केवळ राजकीय नाहीत, तर अत्यंत वैयक्तिक आहेत. माझी आई आजारी असताना दादा सातत्याने तिच्या प्रकृतीची चौकशी करायचे, मला आधार द्यायचे. आईच्या निधनानंतरही त्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले. राजकीय पदापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपणारा नेता काय असतो, याचा अनुभव मला दादांच्या रूपाने आला. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना माझ्या मनात आदरासोबतच कृतज्ञतेची भावनाही आहे.
दादांच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संयम! अनेकदा त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले, टीका झाली; मात्र त्यांनी कधीही खालच्या पातळीवर जाऊन प्रत्युत्तर दिले नाही. विरोधकांवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा आपल्या कामातून उत्तर देण्याची त्यांची पद्धत राहिली आहे. आज मात्र राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन व्यक्तीचा एकेरी उल्लेख करणे, वैयक्तिक पातळीवर टीका करणे आणि सार्वजनिक जीवनातील सभ्यतेची मर्यादा ओलांडणे, असे चित्र निर्माण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्राला मोठ्या मनाने टीका स्वीकारणारे, विरोधकांचा सन्मान करणारे आणि वैचारिक मतभेद असूनही सभ्यतेची मर्यादा जपणारे अनेक आदर्श राजकीय नेते लाभले आहेत. त्या परंपरेचे स्मरण आज होणे गरजेचे आहे. राजकारणात मतभेद असावेत; मात्र मनभेद आणि व्यक्तीचा अवमान असू नये.
माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला आज एकच खंत वाटते की, ज्या व्यक्तीने आयुष्यभर समाजासाठी काम केले, हजारो लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झाले, शिक्षण, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले, अशा व्यक्तिमत्त्वावर टीका करताना किमान त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा विचार तरी व्हायला हवा.
चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखे संवेदनशील, संयमी आणि समाजाभिमुख नेतृत्व ही महाराष्ट्राची ताकद आहे. त्यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात; पण त्यांच्या सामाजिक योगदानाचा आणि माणुसकीच्या स्वभावाचा सन्मान राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
कारण पदे अनेकांना मिळतात, सत्ता अनेकांकडे येते; पण सत्तेचा उपयोग दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी करणारी माणसे विरळाच असतात. चंद्रकांतदादा पाटील हे अशाच माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाचे एक महत्त्वाचे उदाहरण आहेत!



