Spread the news

नवी दिल्ली येथे २० नोव्हेंबरला महात्मा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव व जातनिहाय जनगणना परिषद

­

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा पुढाकार; देशभरातील राष्ट्रीय नेते, महाराष्ट्रातील खासदारांची उपस्थिती; स्वागताध्यक्ष भानुदास माळी यांचे ओबीसी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

  •  

मुंबई (सुरेश यादव) : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव तथा जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता इंदिरा भवन (भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्यालय), कोटला मार्ग, नवी दिल्ली येथे हा सोहळा होणार आहे. या परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व, महाराष्ट्रातील खासदार, प्रदेशस्तरीय पदाधिकारी, ओबीसी समाजाचे नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामाजिक विषमता, जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि शोषणाविरुद्ध संघर्ष केला. शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, शेतकरी आणि बहुजनांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व मानले जाते. त्यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्याबरोबरच वंचित, दलित, बहुजन आणि मागासवर्गीय समाजाच्या घटनात्मक हक्कांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे.

आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी, मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जातनिहाय जनगणनेची आवश्यकता, सामाजिक प्रतिनिधित्व, बहुजनांचे अधिकार आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मितीबाबत या परिषदेत विचारमंथन होणार आहे.

परिषदेचे उद्घाटन राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद भूषविणार आहेत.

या कार्यक्रमाला खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, झारखंडचे प्रभारी तथा ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू, मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार इम्रान प्रतापगढी, सुभाषिणी यादव, नीता डिसूजा, विजय वडेट्टीवार, खासदार चंद्रकांत हांडोरे, बी. व्ही. श्रीनिवास, जितेंद्र बघेल, डॉ. अरुणेश यादव आणि हनुमंत पवार यांच्यासह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील खासदारांची विशेष उपस्थिती

या परिषदेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, नाशिकच्या खासदार शोभाताई बच्छाव, जालन्याचे खासदार कल्याण काळे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, नंदुरबारचे खासदार अॅड. गोवाल पाडवी, भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, सांगलीचे खासदार विशाल पाटील, रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे आणि गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा समावेश आहे. तसेच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आणि गोवा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष तक्षशिला वाघधरे, महिला समन्वयक चित्राताई बाथम आणि महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या सचिव संगीताताई वालदे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

राजस्थानमधील ओबीसी चळवळीचे नेते मोतीबाबा फुले (सांकला), ताराचंद गेहलोत आणि राजेंद्र सेन यांच्यासह विविध राज्यांतील सामाजिक व ओबीसी क्षेत्रातील मान्यवरही या परिषदेत सहभागी होणार आहेत.

भानुदास माळी यांच्या स्वागताध्यक्षपदाखाली द्विशताब्दी जयंती उत्सवाचे आयोजन

या ऐतिहासिक द्विशताब्दी जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महात्मा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मा. भानुदासजी माळी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या स्वागताध्यक्षपदाखाली या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार, ओबीसी समाजाचे प्रश्न, सामाजिक न्याय, जातनिहाय जनगणना आणि बहुजनांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने या परिषदेचे विशेष महत्त्व आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील ओबीसी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुयायी यांनी मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष भानुदास माळी यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून अनंत बाबूजीदादा मोहोड, महासचिव तथा प्रबंधक संपादक ‘शिदोरी मासिक’, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे कार्य पाहत आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा राष्ट्रीय स्तरावर जागर करणे, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन करणे आणि सामाजिक न्याय, जातनिहाय जनगणना व बहुजनांच्या घटनात्मक अधिकारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणणे, या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील :

– दिनांक : शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६
– वेळ : सकाळी ११.३० वाजता
– स्थळ : इंदिरा भवन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्यालय, कोटला मार्ग, नवी दिल्ली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!