Spread the news

ईद फेस्टिवलतर्फे आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी!

­

 

२१ नोव्हेंबरला पाच केंद्रांवर परीक्षा; विजेत्यांसाठी ३० हजार रुपयांची रोख बक्षिसे

  •  

कोल्हापूर, प्रतिनिधी : ईद फेस्टिवल, कोल्हापूरतर्फे शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धे’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन कोल्हापूर शहर व परिसरात पाच परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मरहूम हाजी बाळासाहेब अत्तार, मरहूम हाजी अ. गफूर वंटमुरे आणि मरहूम डॉ. हाजी आदम अत्तार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जीवनचरित्र, सदाचार, बंधुभाव, मानवता आणि नैतिक मूल्यांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांतील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांत परीक्षा होणार आहे. हिंदी भाषेतील ‘दीनीयात’ पुस्तकावर आधारित १०० बहुपर्यायी प्रश्नांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये अशी एकूण ३० हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

पाच ठिकाणी परीक्षा केंद्रांची व्यवस्था

स्पर्धेसाठी मुस्लिम बोर्डिंग, दसरा चौक, कोल्हापूर; मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल, सरनाईक वसाहत, कोल्हापूर; नॅशनल हायस्कूल, इचलकरंजी; उर्दू विद्यामंदिर, रुकडी आणि अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली पुलाची अशी पाच परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

स्पर्धेचे प्रवेश शुल्क केवळ १० रुपये ठेवण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी १०० रुपये किमतीचे हिंदी भाषेतील ‘दीनीयात’ पुस्तक सवलतीच्या दरात अवघ्या २० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळेत उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ईद फेस्टिवलचे अध्यक्ष श्री. गणी आजरेकर यांनी केले आहे. परीक्षा केंद्र व स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी मुस्लिम बोर्डिंग, दसरा चौक, कोल्हापूर येथे अथवा ९५९५००८५९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!