□ कागलमध्ये ऊद्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयांचा प्रवेश समारंभ□ □ मंत्री हसन मुश्रीफ व कुलगुरू डॉ. व्यंकट गीते यांची उपस्थिती□

Spread the news

□ कागलमध्ये ऊद्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयांचा प्रवेश समारंभ□

­

 

□ मंत्री हसन मुश्रीफ व कुलगुरू डॉ. व्यंकट गीते यांची उपस्थिती□

  •  

कागल, दि. २७:
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, मौजे सांगाव व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, पिंपळगाव खुर्द या दोन्ही महाविद्यालयांच्या प्रत्येकी पहिल्या १०० विद्यार्थी संख्येची पहिल्या बॅचचा प्रवेश समारंभ व स्वागत सोहळा ऊद्या शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी होत आहे. कागलमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय संकुल, महात्मा फुले मार्केट, श्रीमंत बापूसाहेब महाराज चौक येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते हे प्रमुख पाहुणे आहेत.
​
या दोन्हीही महाविद्यालयांच्या मुख्य व प्रशासकीय इमारतींसह संकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. नजीकच्या काळात हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत आयुर्वेद महाविद्यालयाची व्यवस्था कागल शहरालगतच पूर्वेला असलेल्या डायटच्या इमारतीत केली आहे, तर होमिओपॅथी महाविद्यालयाची व्यवस्था कागल नगरपालिकेच्या महात्मा फुले मार्केट इमारतीत केली आहे.
​या दोन्हीही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमता प्रत्येकी १०० प्रमाणे आहे. पाच वर्षांच्या पदवीचा काळ पाहता आजपासून पाचव्या वर्षी तब्बल ५०० विद्यार्थ्यांची ही संकुले होणार आहेत. तसेच; पदवीची पाच वर्षे आणि इंटर्नशिपची दोन वर्षे विचार करता येथे प्रवेश घेतलेला विद्यार्थी तब्बल सात वर्षे या संकुलामध्ये असणार आहे. साहजिकच या वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे या सर्वांची जेवण व्यवस्था, निवासाची व्यवस्था यामुळे कागल शहरातील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
​
□ अत्याधुनिक सोयी-सुविधा……!
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक ग्रंथालय तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये अद्ययावत पाठ्यपुस्तके, संशोधन साहित्यासह सुविधाही आहेत. सुसज्ज कौशल्य प्रयोगशाळेसह आधुनिक प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयात अत्याधुनिक बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग सुरू असून पंचकर्म विभागही सुरू आहे. याद्वारे रुग्णांना सुलभ, शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी सुविधा विकसित केल्या आहेत.
​विशेष म्हणजे महाविद्यालय परिसरात आयुर्वेदीय औषधी वनस्पती उद्यान उभारलेले असून औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष ओळख, संवर्धन व संशोधनासाठी हर्बल गार्डनची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. योग, स्वास्थ्यवृत्त व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून योग, आहार-विहार, दिनचर्या, ऋतुचर्या व जीवनशैली व्यवस्थापनाविषयीही मार्गदर्शन सुविधा आहे. या महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये दररोज एकूण सरासरी २५० हून अधिक इतके रुग्ण मोफत उपचार सुविधेचा लाभ घेत आहेत.
​शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयात उत्कृष्ट अभ्यासक्रम पद्धतीनुसार गुणवत्तापूर्ण होमिओपॅथी शिक्षण दिले जात आहे. सक्षम विद्यार्थी, विद्यार्थी केंद्रित शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. आधुनिक कौशल्य विकास प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानासाठी सुसज्ज स्किल लॅब व मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी युनिट तयार आहे. सुसज्ज रुग्णालयीन बाह्य रुग्ण व आंतररुग्ण कार्यरत आहेत. समृद्ध ग्रंथालय, संशोधनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण सुविधा, अध्यापन, संशोधन कार्यशाळा, परिसंवाद व कौशल्य विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयात बाह्य रुग्ण विभागात दररोज साधारण ३०० हून अधिक रुग्णांवर मोफत उपचार केला जात आहे.
​
□ यावत चंद्र दिवाकरो…….!
माझ्या प्रशासकीय काळात अनेक लोकोपयोगी चांगले निर्णय झाले, त्यापैकी माझ्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचे हे दोन निर्णय आहेत. यावत्चंद्रदिवाकरौ म्हणजेच जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि सरकार आहेत, तोपर्यंत ही महाविद्यालये सुरू राहतील.
श्री. हसन मुश्रीफ मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
………….

फोटो : कागल शहराच्या पूर्वेला असलेल्या डायट महाविद्यालयाच्या इमारतीत सुरू असलेले शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व कागल नगरपालिकेच्या महात्मा फुले मार्केटच्या इमारतीत सुरू असलेले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय.
=========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!