दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला ३५२वा शिवराज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांची पुणे येथे राज्यव्यापी बैठक
पुणे : दुर्गराज रायगडावर सहा जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ‘माझा गड माझी जबाबदारी’ हे तत्त्व स्वीकारून गडावर प्लास्टिक कचरा होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेकाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते. शिवाजीनगरमधील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणात बैठक झाली.
संभाजीराजे म्हणाले, “शिवराज्याभिषेक लोकोत्सव झाला असून, सुमारे पाच लाख शिवभक्त गडावर येत असतात. या सोहळ्याची उंची दिवसेंदिवस वाढत आहे. समिती व प्रशासन यांच्यात चांगला समन्वय असून, शिवभक्तांना कोणतीच अडचण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.” २५ जूनला रायगडावर लाइट अॅंड साऊंड शोची चाचणी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संयोगीताराजे म्हणाल्या, “छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी पिढी घडली पाहिजे. शिवभक्तांनी सोहळ्यात निष्ठेने काम करण्यासाठी पुढे यायला हवे.” या वेळी समिती अंतर्गत विविध समित्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. अॅड. स्वप्नील वाळूज, गणेश मोरे, प्रतिक देशमुख, दत्ता वाघ, निलेश पवार, अनिकेत देशमाने, धनंजय भुजबळ,पुष्कर काशीकर
डॉ. संजय पाटील, शुभम मुठाळ यांनी सुचना मा़डल्या.
या वेळी देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे महाराज, विश्वस्त विक्रमसिंह मोरे, प्रशांत मोरे महाराज, राजेंद्र कोंढरे, अप्पासाहेब कुर्डे,
उपाध्यक्ष अतुल चव्हाण, सत्यजित भोसले, प्रशांत दरेकर, चैत्राली कारेकर, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, उदय घोरपडे, प्रवीण पोवार, संजय पवार, प्रवीण हुबाळे, विकास देवाळे, भरत कांबळे, गजानन देशमुख, वरुण भांबरे, सचिन वरपे, डॉ. धनंजय जाधव, माधव देवरसकर, विनोद साबळे उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष सुखदेव गिरी यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
………….
चौकट
धातूच्या बाटल्या वापरा….
गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्लास्टिक बाटल्या आणल्या जातात आणि त्या गडावर फेकल्या जातात. त्यामुळे गडावर कचरा होतो. शिवभक्तांनी प्लास्टिकऐवजी धातुची बाटली वापरावी, असे आवाहन युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी केले.
………….
चौकट
ऐंशी कोटी रुपयांच्या निधीस तत्वतः मान्यता …
रायगडावर पिण्याच्या पाण्याची दरवर्षी अडचण निर्माण होते. त्यासाठी शासनाकडे ऐंशी कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, येत्या दोन वर्षांत पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
…………
फोटो
पुणे : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेकाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत बोलताना समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती. शेजारी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, जालिंदर मोरे महाराज, संदीप खांडेकर, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, चैत्राली कारेकर, सत्यजित भोसले, अतुल चव्हाण,
प्रशांत दरेकर.