मुंबई – महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषि उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून कार्य करणार्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ च्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड झाली असुन केंद्रीय गृह व सहकारीता मंत्री नाम. अमित शाह यांच्या हस्ते त्यांना प्रेसीडेन्शीअल कप प्रदान करून अध्यक्षपदाचा कार्यभार प्रदान करण्यात आला.
शतकमहोत्सव समारोह सुरू झालेल्या वर्षात अध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याचा गौरव प्राप्त करण्यार्या ललित गांधी यांच्या पदभार प्रदान प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री नाम. अमित शाह यांनी मार्गदर्शन करताना ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातुन येत्या शंभर वर्षासाठीचे नियोजन करावे व व्यावसायिक कार्यपध्दतीचा अवलंब करावा असे सांगुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा व अनुभवाची शक्ति ही येणार्या काळातील विकासासाठी महत्वाची ठरणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर संस्थेने उद्योग, व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात नवे उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेढ रोवली. देशात अनेक चेंबर ऑफ कॉमर्स/इंडस्ट्री नाव असलेल्या संस्था आहेत. पण कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर असे एकत्रित नाव असलेली ही एकमेव संस्था असून, याच संस्थेच्या माध्यमातून ‘फिक्की’सारख्या संस्थेची निर्मिती झाली. अशा प्रकारे उद्योग व व्यापाराचे भारतीयीकरण करण्याच्या हेतूने 100 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही संस्था आज अतिशय गौरवाने उभी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र चेंबरचे संचालक मंडळातील सदस्य बी.जी.खेर हे स्वातंत्र्यानंतरचे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले यावरून महाराष्ट्र चेंबरचा प्रभाव लक्षात येऊ शकतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
पुढे ते म्हणाले, आज शेठ वालचंद हिराचंदजी यांचे स्मरण अतिशय महत्त्वाचे आहे, कारण देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्या भूमिपुत्रांपैकी ते एक आहेत. त्यांनी या संस्थेची निर्मिती केली व हजारो लोकांना प्रेरणा दिली. शेठ वालचंदजी यांनी रोपटे लावलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर या संस्थेचे आताचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात या संस्थेसाठी 100 वे वर्ष ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या वैभवशाली परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख करून चेंबरने विकासात केलेल्या सहभागाबद्दल चेंबरचे अभिनंदन केले.
ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चेंबरने महाराष्ट्रा च्या उद्योग व्यापार क्षेत्राच्या विकासा साठी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले असून त्यांच्या पुढील कारकिर्दीत दैदीप्यमान कामगिरी करून महाराष्ट्र चेंबर महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात सहभागी होईल असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी चौथ्यांदा बिनविरोध निवड केल्याबद्दल सभासदांचे आभार मानले.
देशातील कणखर नेतृत्व म्हणून परिचित असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पदभार स्वीकारणे या आयुष्यातील सर्वात गौरवपूर्ण घटना असल्याचे नमूद करून सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आगामी काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्राच्या उद्योग व्यापार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, या क्षेत्राचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून प्रभावी नेतृत्व करू अशी ग्वाही दिली.
फोटो कॅप्शन : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर ची अध्यक्षीय ट्रॉफी ललित गांधी यांना प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्री नाम. अमित शाह सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा