” मी खूप समाधानी…
मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या शिक्षकाचा तनिष्क आणि टायटन शोरूम च्या वतीने झाला सत्कार
कोल्हापूर
मी इथं येतो, मुलींना शिकवतो, मी खूप समाधानी आहे. इतरांना पैसे खर्च करून स्वच्छ हवा मिळवावी लागते. माझं तसं नाही. या नोकरीने मला पगाराबरोबर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य पण दिलंय. त्यामुळे मी खूप आनंदी आहे..”
कावळटेक धनगरवाडा (ता- गगनबावडा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक श्री. जीवन मिठारी हसऱ्या चेहऱ्याने हे सगळं सांगत होते.
आज तनिष्क आणि टायटन शोरूमच्या वतीने डॉ. बी. एम. हिर्डेकर (परीक्षा विभाग प्रमुख) यांच्या हस्ते व उज्वल नागेशकर, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. जीवन मिठारी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व महाविद्यालयातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तनिष्क व टायटन मधील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शाळेतील विद्यार्थिनींना दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या.
अनेकांना नोकरी म्हणजे ओझं वाटतं किंवा तेच ते काम करून कंटाळा येतो. प्रसंगी आपल्या स्वतःच्या किंवा जवळपासच्या गावात बदली घेऊन तिथेच काम करून निवृत्त व्हावं हा सर्वसाधारण अपेक्षा असतात. हे शिक्षक याला अपवाद आहेत. गेली 12 वर्षे कावळटेक धनगरवाडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. ही शाळा 1974 पासून सुरू आहे. परिसरातील अनेक विद्यार्थिनी इतक्या वर्षात या शाळेतून शिकून गेल्या. श्री. जीवन मितारी कळे येथे राहतात. तिथून 25 किलोमीटरवर असलेल्या धुंदवडे गावापर्यंत स्कुटरने येतात. त्यानंतर अडीच किलोमीटर घनदाट जंगल आणि डोंगरातली वाट तुडवत शाळेत पोचतात. सध्या फक्त दोन मुलींना शिकवण्यासाठी श्री. मिठारी या ठिकाणी येतात. याठिकाणी अन्य कोणी असते तर कदाचित वशिला लावून बदली करून अन्य ठिकाणी निघून गेले असते. पण श्री. मिठारी यांनी मुलींना शिकवण्याचं ‘पॅशन’ जपलंय. या शाळेचे शिपाई, शिक्षक, मुख्याध्यापक सबकुछ फक्त श्री. मिठारीच. काही काळ ते प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुद्धा होते.
यावेळी श्री. हिर्डेकर सर व श्री. उज्वल नागेशकर यांनी श्री. जीवन मिठारी यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच श्री. प्रसाद कामत यांनी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री. मितारी यांचा सत्कार करून सामाजिक भान जपल्याबद्दल कौतूक केलं.
आजकालच्या शिक्षणाच्या व्यावसायिक स्पर्धेत फक्त दोन विद्यार्थिनींना शिक्षण देणारे श्री. जीवन मिठारी इथल्या वस्तीला देवमाणूसच वाटत असणार याची खात्री आहे.
श्री. जीवन मिठारी यांच्यासाठी शिकवणे हेच जीवनाचे गीत आहे, ज्यात त्यांना परमानंद मिळतो.