*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या*
*अमर्याद संधी – डॉ. ए. के. गुप्ता*
-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे प्रवेश प्रकिया मार्गदर्शन सेमिनार संपन्न
आर्किटेक्चर हा सर्वाधिक रोजगार देणारा अभ्यासक्रम आहे. अर्बन प्लॅनिंग, इंटरियर डिझाईन, ग्रीन बिल्डींग, स्मार्ट सिटी आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अमाप संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए. के. गुप्ता यांनी केले.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा यांच्या वतीने आयोजित ‘आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रिया२०२५-२६’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सेमिनारमध्ये डॉ. गुप्ता बोलत होते. या सेमिनारला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी डॉ. ए. के. गुप्ता यांनी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया (CAP) चे विविध टप्पे, आवश्यक कागदपत्रांची यादी, ऑनलाइन नोंदणी व पोर्टल वापराचे मार्गदर्शन, तसेच मागील वर्षीच्या कट-ऑफ आदी माहिती दिली. ऑप्शन फॉर्म भरण्याचे योग्य तंत्र आणि त्यात होणाऱ्या सामान्य चुका कशा टाळाव्या याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या शंका समाधान सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपले प्रश्न विचारले, त्याला डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट आणि समाधानकारक उत्तरे दिली.
या सत्रामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ दूर होऊन योग्य दिशा मिळाली आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन प्रा. तन्वी शेटके यांनी केले. यावेळी प्रवेश प्रकिया प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी, तसेच स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे विभाग प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव, डीन स्टुडंट्स अफेयर्स डॉ. राहुल पाटील, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, प्रा. अभिजीत मटकर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.