अवसायन नोटीसप्रकरणी दूध संस्थांचे मा. सहाय्यक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर यांना निवेदन; मतदान हक्क अबाधित ठेवण्याची मागणी

Spread the news

अवसायन नोटीसप्रकरणी दूध संस्थांचे मा. सहाय्यक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर यांना निवेदन; मतदान हक्क अबाधित ठेवण्याची मागणी

­

 

 

  •  

कोल्हापूर, ता. ३० : गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी अवसायन (लिक्विडेशन) नोटीस व मध्यंतरी आदेशाच्या रद्द करावा व आपला मतदान हक्क अबाधित ठेवण्याची मागणी करत मा. सहाय्यक निबंधक (दुग्ध), कोल्हापूर प्रदीप मालगावे यांना निवेदन देण्यात आले.

          निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित संस्था दुर्गम व ग्रामीण भागात कार्यरत असून स्थापनेपासून सातत्याने गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे कार्य करत संघाच्या जडणघडणीत संस्थांचे मोलाचे योगदान राहिले आहे. तसेच, शासन नियमांनुसार लेखापरीक्षण व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळोवेळी करण्यात आलेली असून मागील निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्कही बजावण्यात आलेला आहे.

          दरम्यान, नोव्हेंबर २०२३ मध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत अनेक संस्थांना अवसायन संदर्भात नोटीस व मध्यंतरी आदेश देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात संबंधित संस्था नियमित कार्यरत असून दूध संकलन व पुरवठा सुरळीत सुरू असल्याने त्यांचा अवसायन यादीत समावेश अन्यायकारक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, काही व्यक्तींनी याचिकेद्वारे संस्थांना “बोगस” ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे संस्थांची प्रतिमा मलिन होत आहे व सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः आगामी गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान हक्काबाबत अनिश्चितता निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

          निवेदन स्वीकारताना सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संस्थांना आश्वस्त केले. “दूध संस्थांना योग्य तो न्याय दिला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. सध्या सुमारे ११०८ पैकी काही दूध संस्थांची सुनावणी सुरू केली असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.

          संबंधित प्रकरणाची सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करून पात्र संस्थांची नावे अवसायन यादीतून वगळावीत, त्यांचा मतदान हक्क अबाधित ठेवावा व गोकुळ दूध संघाची निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी संस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

          यावेळी निवेदन देताना अनंतराव कुलकर्णी दूध संस्था अ.लाटचे विद्याधर कुलकर्णी, स्वामी समर्थ दूध संस्था बामणीचे युवराज पाटील, विठ्ठलाई देवी दूध संस्था कौलवचे केरबा पाटील, संभाजी खोत भुयेवाडी, विश्वासराव इंगवले हातकणंगले, दादू पाटील मरळी, आनंदा पाटील तळये खुर्द, शिवाजी शिंदे भुदरगड, विजय सरननोबत पन्हाळा, महादेव मोरे आजरा, गुरुनाथ शिंदे शाहुवाडी आदी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!