*
आमदार सतेज पाटील यांनी राहुल पाटील यांना आशीर्वाद द्यावा, अडथळा नको
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद……!*
□ राहूल पाटील व राजेश पाटील या पाटील बंधुंसह आमदार कै. पी. एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हत्तीचे बळ मिळणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचा झेंडा फडकविण्यास फार मोठा हातभार लागणार आहे, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी इतकेही हाळवे होवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
□ राहुल पाटील यासारख्या शक्तीमान माणसांच्या पक्षप्रवेशाने करवीरसह जिल्हयात राष्ट्रवादी पक्षाची राजकीय ताकद वाढली आहे. राहुल पाटील व राजेश पाटील या बंधूंनी गत महिनाभर तालुक्यात दौरे करुन आपल्या कार्यकर्त्यांसमोर अडीअडचणी सांगून कार्यकर्त्यांशी चर्चेनंतरच हा निर्णय घेतला आहे.
□ संपूर्ण हयातभर कै. पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जीवंत ठेवण्यासाठी इमाने-इतबारे पक्षाची सेवा केली. आता त्यांची मुले भवितव्याचा विचार करून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांना सहकार्य करता येणार नसेल तर अपशकुन करून अडथळा आणू नयेत. त्यांना आशीर्वाद द्यावेत, अशी विनंतीही मंञी मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना केली.
□ चंद्रदीप नरके यांच्याशी विरोध कायम राहील या राहुल पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन जागा वाढणार आहेत. कदाचित मतदार संघाची विभागणी झाली तर राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके हे मित्रही असतील. आपला गट टिकवण्यासाठी सगळ्यांकडूनच अशी वक्तव्ये होत असतात.
□ गोकुळ दूध संघाच्या जाजम आणि घड्याळ वाटपाच्या आरोपाबद्दल विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, याबाबत संघाने यापूर्वीच योग्य तो खुलासा केलेला आहे. आम्ही जी- जी आश्वासने दूध उत्पादकांना दिली आहेत, ती पूर्ण केली आहेत. दूध खरेदी दरवाढ दोन रुपये देण्याचे वचन दिले होते. तिथे बारा रुपये दरवाढ दिली. भविष्यात हा दूध संघ फार मोठा होतोय. कृपया, याला कुणी अपशकुन करू नका.
□कोल्हापूरचा २०टक्के जीडीपी वाढणार:
सरन्यायाधीश माननीय भुषण गवई यांच्या माध्यमातून लवकरच खंडपीठही साकारत आहे. यामुळे कोल्हापूरात विकासाचे महाद्वार उघडले जाणार असून जिल्हयाचा २० टक्के जीडीपी वाढणार आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करणे, शेंडा पार्क येथील जागेत इमारत, यासह आयटी पार्क निर्माण करण्याची गरज असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
□ कोल्हापूरातील रस्त्यांसाठी निधी आणू:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करु. हे काम पावसाळा झाल्यानंतर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाहीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
□ त्या भुमिकेवर आजही ठाम:
मंत्री मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ बाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लपवून ठेवलेली नाही. शेतकऱ्यांवर न लादता त्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गची वाटचाल करणार आहोत. या भुमिकेवर आजही ठाम असून १५ आँगस्ट रोजी शेताशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी आणि खर्डा भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशीही कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली.
□ कोणत्याही सनदी अधिकाऱ्यांनी शासकीय परदेश दौरा करायचा झाल्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलीच पाहिजे, या श्री. फडणवीस यांच्या भूमिकेचे मंत्री यांनी जोरदार समर्थन केली. खाजगी दौरा करतानासुद्धा अशी परवानगी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
□ राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपाबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यांना प्रतिज्ञापत्र देण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलेले आहे. दरम्यान; कोल्हापूर जिल्ह्यात मतचोरी झाल्याचा आरोप आजतागायत कुठेही झालेला नसल्याकडेही श्री. मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.
========