शासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर
कोल्हापूर दि. 25 (जिमाका): राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी https://hmas.mahait.org या शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर प्रवेश अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक देण्यात आले आहे.
शासकीय वसतीगृह पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2025-26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
बी.ए./बीकॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी – 25 फेब्रुवारी ते 10 मार्च, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे- 11 मार्च व निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 13 ते 20 मार्च असणार आहे.
योजनेसाठी पात्र असणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील नमूद कालावधीत https://hmas.mahait.org शासनाच्या या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण (तिसरा मजला), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.



