पुणे: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) प्रदान करण्यात आला.
स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, रुपये 3 लाखअसे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. ह्या पुरस्कारांमुळे एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६ व्या स्थापना दिनी आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. मा.ना. श्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य , प्रमुख अतिथी होते, व त्यांनी ऑनलाइन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ शंकर वासुदेव अभ्यंकर, अध्यक्ष , आदित्य प्रतिष्ठान हे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ. सुरेश गोसावी, प्रा. डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्रभारी कुलसचिव, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, शैक्षणिक परिषदेचे सदस्य, विविध शाखांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
“संस्थेने दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा कायम जपली असून, यातून विद्यार्थ्याचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे काम अविरतपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य देण्यासोबतच सुजाण व सजग नागरिक बनवण्यावर संस्थेच्या महाविद्यालयांचा भर राहिला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या या यशात शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, तसेच माजी विद्यार्थ्यांचे योगदान आहे,” असे मत व्यक्त करत संस्थेचे श्री मालोजीराजे छत्रपती, मानद सचिव, एआयएसएसएम सोसायटी यांनी अभिनंदन केले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे सहसचिव श्री सुरेश शिंदे, खजिनदार श्री अजय पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री राहुल यादव तसेच विश्वस्त मंडळाने शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अभिजीत मंचरकर म्हणाले, “दर्जेदार शिक्षण, नावीन्यपूर्ण संशोधन आणि सर्वांगीण विकास या तत्वांवर संस्था कार्यरत आहे. महाविद्यालयाला प्राप्त झालेला हा पुरस्कार याची साक्ष देतो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील नावीन्यपूर्ण व कौशल्यपूर्ण शिक्षण पद्धती, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, विविध विदयार्थी विकास उपक्रम, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवृंद हे या पुरस्कारामागील गमक आहे. सातत्याने विविध शैक्षणिक तसेच इतर उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. स्टार्टअप व इनोव्हेशन सेल यांच्यामार्फत उद्योजकता संस्कृती रुजवली जाते. ज्यामुळे विद्यार्थी उद्यमशील होण्यास मोठी मदत होते.”
राष्ट्रीय मूल्यमापन व मान्यता परिषदेनेही (नॅक) एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला प्रतिष्ठित ‘अ+’ दर्जा बहाल केला आहे. नॅकच्या पहिल्या फेरीत, ३.२७, तर दुसऱ्या फेरीत ३.३२ सरासरी श्रेणी (सीजीपीए) प्राप्त केली आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याने, एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. विद्यार्थीदेखील येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. व्यावसायिक व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात संस्थेने आपले स्थान मजबूत केले असल्याचे दिसून येते.