अखेर गोकुळचं राजकारण थंडावलं अरुण डोंगळे यांचा होणार बुधवार नंतर राजीनामा चर्चा सुरू झाली नव्या अध्यक्षपदाची

Spread the news

अखेर गोकुळचं राजकारण थंडावलं

अरुण डोंगळे यांचा होणार बुधवार नंतर राजीनामा

चर्चा सुरू झाली नव्या अध्यक्षपदाची

    •  

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे हे राजीनामा देणार हे निश्चित झाले आहे. मंगळवारी ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि त्यानंतरच आपला राजीनामा देणार आहेत. हा राजीनामा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत झालेल्या चर्चे नुसार बुधवार नंतर कधीही होणार आहे. त्यामुळे आता गोकुळचा नवीन चेअरमन कोण याची उत्सुकता वाढली आहे. सध्या शशिकांत पाटील चुयेकर आणि अजित नरके या दोन नावाभोवती चर्चा सुरू आहे.

गोकुळचे चेअरमन डोंगळे यांनी आठ दिवसापूर्वी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगत नाहीत तोपर्यंत आपण राजीनामा देणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे मात्र स्थानिक नेते असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी राजीनामा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी मंत्री-मुश्रीफ आणि डोंगळे यांची अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर डोंगळे हे राजीनामा देण्यास तयार झाले. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटल्यानंतर आपण राजीनामा देऊ असे त्यांनी सांगितले आहे. यानुसार डोंगळे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सोमवारीच मुंबईला रवाना झाले आहेत. मंगळवारी ते दोन्ही नेत्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगतील. महायुतीचा चेअरमन व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतील.

बुधवारी कोल्हापुरात आल्यानंतर चार-पाच दिवसात ते आपला राजीनामा संघाचे कार्यकारी व्यवस्थापक योगेश गोडबोले यांच्याकडे सादर करतील. तो मंजूर झाल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात येईल. यामध्ये किमान आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन चेअरमन निवड होईल.

गेले काही दिवस चेअरमन पदावर एका नावाची चर्चा सुरू होती. पण आता डोंगळे यांच्या बंडामुळे त्या नावाचा आग्रह कमी झाला आहे. यामुळे आता नवीन नावाभोवती चर्चा सुरू झालेली आहे. सध्या या पदासाठी गोकुळ दूध संघाचे संस्थापक आनंदराव पाटील सुवेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यासह अजित नरके आणि करण सिंह गायकवाड यांची नावे ही चर्चेत आहेत. सर्वांना मान्य होईल असे नाव आम्ही निश्चित केले आहे, त्यानुसार नव्या चेअरमनची निवड होईल असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!