अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत 22 ला दिल्लीत बैठक
कोल्हापूर ता.१६(प्रतिनिधी)
कोल्हापूर, सांगली आणि परिसराला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो. याला कारणीभूत आसलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आणि पाण्याचा विसर्ग या मुद्द्यावर खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत तसेच मंत्रालयाकडे सातत्याने आवाज उठवला होता.
खासदार माने यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कारण त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांच्या जिविताला आणि शेतीला धोका निर्माण होतो, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या मागणीची जलशक्ती मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली असून, या विषयावर एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक २२ मे २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता, संसद भवनातील ‘डी’ समिती कक्षात होणार आहे.
या बैठकीसाठी जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खासदार धैर्यशील माने यांना अधिकृतरित्या आमंत्रित करण्यात आले आहे.
बैठकीत अलमट्टी धरणाचा संभाव्य परिणाम, राज्यांमधील समन्वय, आणि पूरनियंत्रणावर चर्चा होणार आहे.
खासदार माने यांची भूमिका ही फक्त कोल्हापूरच्या नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या हितासाठी महत्त्वाची ठरत आहे. बैठकीत महाराष्ट्राच्या जलहक्कांचे संरक्षण, नद्यांचे प्रवाह नियंत्रण, आणि पूरप्रभावित भागांचे दीर्घकालीन नियोजन या मुद्द्यांवर होणार आहे.