समूहगीत स्पर्धेत पद्माराजे गर्ल्स हायस्कूल प्रथम
को.दि.31 : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर समिधा प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या आणि अत्यंत उत्साहात पार पडलेल्या आंतर शालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेमध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलने आठवी ते दहावी गटात प्रथम क‘मांक पटकावला. पाचवी ते सातवी गटात छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूल ने तर मनपा शाळा गटात टेंबलाईवाडी विद्या मंदिर ने प्रथम क‘मांक पटकावले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी समिधा प्रतिष्ठानच्या वतीने आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.
श्री कपिलेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग यज्ञोपवित आणि आसमा चे संचालक विवेक मंद्रूपकर यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर महानगरपालिका शाळा, खाजगी शाळा पाचवी ते सातवी गट आणि खाजगी शाळा आठवी ते दहावी गट अशा गटात शाळांच्या संघांनी आपली गीते सादर केली. 16 शाळातील 22 संघामधून सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
पारितोषिक वितरणावेळी प्रमुख पाहुणे कोल्हापूर अर्थ वॉरियर्स चे अभिजीत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना भगीरथ प्रयत्नांची कथा सांगून सध्याच्या जगातील प्लास्टिकचा भस्मासूर गाडण्यासाठी प्रत्येकाने असेच भगीरथ प्रयत्न करावे लागतील असे सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करताना लोप पावत चाललेल्या समूह गायन प्रकारास उत्तेजना मिळावी तसेच समूहगीते समजून घेऊन विद्यार्थ्यांनी भविष्यात देशभक्त नागरिक बनावे हा उद्देश असल्याचे विदित केले. परीक्षक प्रदीप कुलकर्णी यांनी कोणत्या मुद्द्यावर परीक्षण केले याची माहिती उपस्थिताना दिली.
सर्व यशस्वी संघांना अभिजीत कुलकर्णी, विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य ऍड. स्वागत परुळेकर, परीक्षक मधुसूदन शिखरे, अजित ठाणेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, समिधा प्रतिष्ठानचे चिंतामणी बकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अमित कांबळे, ऋतुराज नढाळे, बाळासाहेब वणकुद्रे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे :
मनपा शाळा गट :
1) टेंबलाईवाडी विद्यामंदिर, 2) महात्मा फुले विद्यालय, 3)डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर
उत्तेजनार्थ : राजे छ. संभाजी विद्यालय
खाजगी शाळा 5 वी ते 7 वी गट :
1) छ. शाहू इंग्लिश मिडीयम स्कूल, 2) विमलादेवी गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल, 3) नरके पन्हाळा पब्लिक स्कूल, उत्तेजनार्थ : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल
खाजगी शाळा 8वी ते 10 वी गट :
1) प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,2) नरके पन्हाळा पब्लिक स्कूल, 3) छ. शाहू इंग्लिश मीडियम स्कूल
उत्तेजनार्थ : प्रायव्हेट हायस्कूल
प्रति,
मा. संपादकसाो, दै.कृपया प्रसिध्दीसाठी,
आपला विश्वासू,