वंदूरला जलजीवन मिशनच्या योजनेला गळती, गावकऱ्यांची पाण्यासाठी धावाधाव
कागल: प्रतिनिधी
वंदूर ता. कागल येथील सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेला गळती लागली आहे. ग्रामपंचायतीकडून गळती काढण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे मात्र ग्रामपंचायत आणि प्रशासकीय अधिकारी यांनी या कामाकडे पाठ फिरवल्याने मूलभूत समस्यांची कोणालाच काळजी नाही का असा सवाल गावकरी विचारत आहेत.
दुधगंगा नदीतून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेतकडून जल जीवन मिशनची योजना गावात राबवण्यात आली आहे मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने गावाचा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प झाला. गावच्या ग्रामपंचायतवर प्रशासक असल्याने तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सेवा निवृत्ती घेतल्यामुळे नवीन प्रशासकीय अधिकारी अजूनही रुजू झालेले नाहीत, गळती काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्यांचा पुरवठा ग्रामपंचायतीने केला नसल्याने गळती काढण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाला परिणामी गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. तातडीने गळतीचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा गावकरी करत आहेत.
निवडणुका जवळ आल्या तरीही पुढार्यांचे दुर्लक्ष..
11 सदस्य असलेल्या वंदूर ग्रामपंचायतची मुदत संपलेली आहे यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून धनश्रीदेवी घाटगे काम पाहत आहेत, ऐन सणासुदीच्या काळात गावातील पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे मात्र गेली पाच वर्ष पुढारी म्हणून काम केलेले प्रतिनिधी आता कोणत्याही कामात लक्ष घालायला तयार नाहीत यामुळे वंदूर ग्रामस्थांचा पुढाऱ्यांबाबत नाराजीचा सूर आहे. येत्या काही दिवसात निवडणुका होणार आहेत, तेव्हा मतदानासाठी हाक देणाऱ्या गाव पुढार्यांना जाब विचारू असा इशारा गावातील तरुण मंडळी देत आहेत.
रस्ते आणि गटारींचा प्रश्न ऐरणीवर….
गावातील अनेक प्रभागात ग्रामपंचायतीकडून विकासाची काम करण्यात आली मात्र अनेक प्रभागात रस्ते आहेत मात्र गटारी नाहीत अशी परिस्थिती आहे, गावातील पानंदी आणि रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, गावाला असलेली स्मशानभूमी तर कधी पडते अशी अवस्था असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार अशा वल्गना आता केल्या जात आहेत यामुळे येणारी पंचवार्षिक निवडणूक गावाच्या मूलभूत प्रश्नांवरून रंगणार आहे.



