केंद्र शासनाच्या इथेनॉल धोरणाला शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा-समरजितसिंह घाटगे ४९व्या वार्षिक सभेत ‘शाहू’च्या सभासदांचा एकमुखी पाठिंबा

Spread the news

केंद्र शासनाच्या इथेनॉल धोरणाला शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा-समरजितसिंह घाटगे

­

 

४९व्या वार्षिक सभेत ‘शाहू’च्या सभासदांचा एकमुखी पाठिंबा

  •  

कागल: केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मितीचे धोरण शेतकरी, साखर कारखानदार आणि देशाच्या हिताचे आहे. त्यामुळे या धोरणाला शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी शाहू कारखान्यातर्फे १२ मे. टन प्रतिदिन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा घाटगे यांनी केली.केंद्राच्या इथेनॉल धोरणास सभासदांनी हात उंचावून एकमुखी पाठिंबा दर्शविला.

समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देण्यास मदत झाली आहे. साखर पोत्यावरील व्याजात बचत झाली.साखर उद्योगातील पुढील दहा वर्षाच्या अंदाजानुसार कारखान्याने नियोजन केले आहे.पेट्रोल-डिझेल व गॅससाठी परदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राने बायोफ्युएल धोरण स्वीकारले आहे.आता केंद्राच्या अनुदान योजनेचा लाभ घेत दररोज १२ मे.टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या, बदलत्या परिस्थितीत सर्व साखर कारखान्यांचे गाळप कमी होत आहे.मात्र जितके जास्त गाळप तितके कारखान्याचे अर्थकारण मजबूत असे स्व. राजेसाहेब नेहमी सांगायचे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी अल्पकालीन फायद्यासाठी ऊसाची इतर विल्हेवाट न करता संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितास पाठवावा,असे आवाहन त्यांनी केले.

सभेच्या सुरूवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले.

स्वागत व श्रध्दांजली वाचन व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले.विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले.विषय पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी मंजूरच्या जयघोषात व टाळ्यांच्या कडकडात मंजुरी दिली.सभासदांकडून आलेले अभिनंदन ठरावाचे वाचन असि.सेक्रेटरी व्ही.एल.जत्राटे यांनी केले.
सभेस जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,सर्व संचालक-संचालिका,राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे, राजे वीरेंद्रसिंह घाटगे आदी उपस्थित होते.
संचालक युवराज पाटील यांनीआभार मानले.वंदे मातरम् होऊन सभेच्या कामकाजाची सांगता झाली.

छायाचित्र- कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,समोर हात उंचावून केंद्राच्या इथेनॉल धोरणास पाठिंबा दर्शवताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सभासद .

चौकट
सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध उपक्रम

शाहू कारखाना पुढील वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.कोल्हापूरला स्टार्टअप हब बनविण्याच्या दृष्टीने राजर्षी शाहू स्टार्टअप मिशनच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन व पाठबळ देण्यात येईल,असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!