Spread the news

नैवेद्य फेस्टिवल’ मधून भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडले  – मा. रोहित टिळक

डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘नैवेद्य फेस्टिवल’ उत्साहात

कोल्हापूर दि. 11 : गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणाला खाद्यसंस्कृतीची जोड देत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय, कोल्हापूर येथे गणेशोत्सवानिमित्त ‘नैवेद्य फेस्टिवल’ उत्साहात पार पडला.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य टिळकांचे वंशज व लोकमान्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष   मा. रोहित टिळक, हे लाभले होते.  या प्रसगी ते म्हणाले, आजच्या युगात हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक शिक्षणाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे.  त्यामुळे हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपले चांगले करिअर घडविता येणार आहे. गणेश उत्सवात नैवेद्य फेस्टिव्हल घेऊन लोकमान्य टिळकांच्या या उत्सवाचा सन्मान आपल्या महाविद्यालयाने वाढविला आहे.  विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती बद्दल मी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करतो.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ्‍ गावडे हे उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले, गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या फेस्टीवलला लोकमान्य टिळकांचे वंशज मा. रोहित टिळक हे  प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्यामुळे या कार्यक्रमास एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे.  बहुजन समाजातील सामान्य मुले स्वावलंबी व्हावीत या उद्देशाने संस्थेने हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु करुन विद्यार्थ्याना रोजगाराची तसेच उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध् करुन दिली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा करुन घ्यावा. विद्यार्थ्यांच्या पाककौशल्याला, सर्जनशीलतेला आणि भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचे संचालक  मा.धनराज भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले, आमच्या महाविद्यालयातर्फे दरवर्षी  ‘नैवेद्य फेस्टिवल’ चे आयोजन करण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांना आपली पाककला सर्वांसमोर सादर करण्याची एक चांगली संधी प्राप्त होते.

 ‘नैवेद्य फेस्टिवल’मध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय खाद्यपरंपरेचे दर्शन घडविणारे सत्तरहून अधिक पारंपरिक नैवेद्य पदार्थ तयार करून सादर केले. यामध्ये देशातील विविध राज्यातील खादय संस्कृतीचे दर्शन घडविणारे स्वादिष्ट पदार्थ ,  गणेशोत्सवातील प्रमुख नैवेद्य  होते.  यामध्ये उकडीचे मोदक, पुरणपोळी, विविध प्रकारचे लाडू, करंजी, मसालेभात यांसह विविध पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश होता. प्रत्येक पदार्थाची मांडणी, सजावट, स्वच्छता आणि सादरीकरण यामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष कल्पकता दाखवली. यामध्ये पदार्थाबरोबरच विद्यार्थ्यांनी त्या त्या राज्यातील वेशभूषाही परिधान करुन प्रसादाचे सादरीकरण केले.

खाद्यपदार्थांसोबतच विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश सजावट करून उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक खुलविले. पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ, त्यांची कलात्मक मांडणी आणि आधुनिक हॉटेल मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून केलेले सादरीकरण यामुळे फेस्टिवलला विशेष रंगत आली. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांमुळे केवळ पाककौशल्य विकसित होत नाही, तर नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, स्वच्छता, टीमवर्क, सादरीकरण, ग्राहकाभिमुखता आणि आयोजन कौशल्य यांचाही प्रत्यक्ष अनुभव मिळतो. त्यामुळे ‘नैवेद्य फेस्टिवल’ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध खाद्यपदार्थांची पाहणी करून त्यांच्या पाककौशल्याचे, कल्पकतेचे, सादरीकरणाचे आणि संघभावनेचे कौतुक केले. भारतीय खाद्यसंस्कृती ही देशाच्या समृद्ध परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, आधुनिक आतिथ्य व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांनी या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच त्याला आधुनिकतेची जोड द्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि आधुनिक आतिथ्य व्यवस्थापन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून पारंपरिक पदार्थांना आकर्षक आणि व्यावसायिक स्वरूप देत खाद्यपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. अभयकुमारजी साळुंखे होते. यावेळी डॉ. विरेन भिर्डी, संचालक , डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरी ॲण्ड टेक्नॉलॉजी , विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी.बी.पाटील, लोकमान्य्‍ टिळक महाराष्ट्र विद्यापीठचे विश्वस्त्‍ मा.मयुरेश दळवी व मा.गौरव गोर्डे  तसेच परीक्षक म्हणून श्री. जे.बी.बारदेसकर , जनरल मॅनेजर, हॉटेल पॅव्हिलीयन कोल्हापूर ,  प्रा. गौरी राऊत, श्री. शैलेश राऊत, श्री. आकाश पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

————————————————————————————————————–

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!