सावली सोशल सर्कल आयोजित घरगुती गणेश आरास रील स्पर्धेस उत्तुंग प्रतिसाद; विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव!
सावली सोशल सर्कलच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘घरगुती गणेश आरास रील स्पर्धे’ला राज्यभरातून उत्तुंग प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल ३७ स्पर्धकांनी आपला उत्साही सहभाग नोंदवून बाप्पाच्या देखण्या व सृजनशील आरासींचे दर्शन घडवले.
या स्पर्धेसाठी १९ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी व व्हिडिओ मागवण्यात आले होते. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी सावली सोशल सर्कलच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून सर्व स्पर्धकांची रील प्रसिद्ध करण्यात आली. सोशल मीडियावरील रसिकांचा प्रतिसाद, व्हिडिओला मिळालेले ‘लाईक्स’ (Likes), ‘कमेंट्स’ (Comments), ‘शेअर्स’ (Shares) आणि ‘व्ह्यूज’ (Views) यांच्या आधारे अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली.
या चुरशीच्या स्पर्धेत आकाश किल्लेदार, आदित्य भोगुलकर, अमित सुतार आणि प्रसन्न बुलबुले यांनी उत्कृष्ट रील व डिजिटल लोकप्रियतेच्या जोरावर प्रथम चार पारितोषिकांवर आपले नाव कोरले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. या प्रसंगी सर्व सहभागी स्पर्धक तसेच सावली सोशल सर्कलचे संस्थापक-अध्यक्ष किशोर देशपांडे, अनुप कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना व सहभागींना सन्मानित करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले.



