*शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही*
*गोकुळच्या सत्तेचा मार्ग शिरोळमधून अधिक भक्कम करणार!*
*आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची ग्वाही*
*शिरोळमधील महायुतीच्या प्रचार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*
शिरोळ, दि. ११:
गोकुळ दूध संघातील सत्तेची पुनरावृत्ती करण्यासाठी शिरोळ तालुका महत्त्वपूर्ण योगदान देईल. तालुक्याला उमेदवारी देऊन महायुतीच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासूनची उणीव भरून काढली आहे. त्यामुळे २७० पैकी २०० हून अधिक मते महायुतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मिळवून देत गोकुळमध्ये युतीची सत्ता कायम ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देऊ, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गोकुळची निवडणूक म्हणजे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या संसार,चुलीशी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. विरोधक फेक नरेटीव्ह पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुधदर वाढवून देणार,चुयेकराच्या मुलाला चेअरमन करणार अशा घोषणा करत आहेत. मग तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे का केला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधक खोट्या सहानुभूतीचा आधार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही निवडणूक एकतर्फीच होवून आपले संपूर्ण पँनेल बहुमतांनी विजयी होणार आहे. मात्र, निवडणूक कोणतीही असली तरी निष्काळजी न राहता सर्वांनीच गांभीर्याने घेवून प्रत्येक तालुक्यातील प्रमुखांनी जाहीर केलेल्या मतांचा आकडा मतपेटीत कसा जाईल याची काळजी घ्यावी.
दुष्काळातही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हात बळकट : महाडिक
सध्या राज्य आणि संपूर्ण देश दुष्काळाचा सामना करत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दुध संघाच्या माध्यमातून दुधबिलाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात वेळेत मिळत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. भविष्यात दुधदर आणखी वाढवून देणे, जनावरांची वैद्यकीय उपचार सुविधा उत्तम आहे.त्यामध्ये आणखी गतिमानता आणणे, महिलांच्या योगदानाची कृतज्ञता म्हणून त्यांना विमा, मुलांना शिष्यवृत्तीची योजना आणण्याचा विचार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले
*सर्वच उमेदवारांचे घट बसवा : मंत्री मुश्रीफ*
लवकरच आमच्या आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याची तंतोतंत अंमलबजावणीही करणार आहोत. दुधदर, पशुवैद्यकीय सेवा, सकस पशुखाद्य, जनावरांचे खरेदी अनुदान यासह विविध योजनांचा समावेश असणार्या हा जाहीरनामा म्हणजे दुध उत्पादकांसाठी छप्पर फाडके देणारा आहे. त्यामुळे दसर्याच्या मुहूर्तावर भरघोस मताधिक्य देवून सर्वच्या सर्व २५ उमेदवारांचे घट बसवा असे आवाहनही ना मुश्रीफ यांनी करताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, संजय पाटील यड्रावकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील टाकवडेकर, अमरसिंह पाटील, रामचंद्र डांगे, सतीश मलमे, धनाजी जगदाळे आदी प्रमुख उपस्थित होते.
……….
*शिरोळ: गोकुळ निवडणुकीत महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या ठराव धारकांच्या मेळाव्यात बोलताना खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ राजेंद्र पाटील -यड्रावकर व ठरावधारक.*
===========



