*महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल*
*पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वास*
*महायुतीच्या प्रचारार्थ अर्जुनवाडा येथे राधानगरी व भुदरगडमधील ठराव धारकांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद*
अर्जुनवाडा, दि. १२:
महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगड तालुक्यांचा सिंहाचा वाटा असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अर्जुनवाडा ता. राधानगरी येथे राधानगरी व भुदरगड तालुक्यातील ठराव धारकांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, सत्तेच्या पाठबळाशिवाय सहकाराच्या विकासाला गती मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या विकासाचा महायुतीचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मागील सहा महिन्यांपासून गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. महायुतीची भूमिका आणि विरोधकांची भूमिका जनतेसमोर आहे. महायुतीच्या पॅनेलला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. गोकुळच्या मागील निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मताधिक्यात राधानगरी तालुक्याचा सिंहाचा वाटा होता. यंदाच्या निवडणुकीतही राधानगरी-भुदरगड तालुका महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मागील पाच वर्षांत गोकुळ दूध संघाने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. संघाने २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठले असून, मागीलवेळी दिलेल्या आश्वासनानुसार दूध दरवाढही केली आहे. गोकुळ हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट ठरला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करणे आवश्यक आहे. मतदान करताना मतपत्रिकेवरील नाव आणि गाव वाचत बसण्यापेक्षा कापबशी हे चिन्ह दिसताच शिक्का मारावा, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीचा विजय निश्चित असला, तरी विरोधी आघाडीकडून विविध आमिषे दाखवली जात आहेत. ठरावधारकांनी या आमिषांना बळी पडू नये. गोकुळ दूध संघ हा सामान्य आणि कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कणा आहे. राधानगरी-भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरावधारक महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधक वेगवेगळ्या कथा सांगून मतदारांचा मनभेद करण्याचे काम करीत आहे. गेल्या निवडणुकीत राधानगरी भुदरगड तालुक्याने मताधिक्याचा उच्चांक केला होता. या निवडणुकीतही तो उच्चांक अबाधित राहील याची मला खात्री आहे. गोकुळ दूध संघाची ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्याकडे निघालेली आहे. घटस्थापना होऊन पवित्र असा दसरा सणही सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर ठरावधारक सभासदांना नवदुर्गासह विविध देव-देवतांचे दर्शन घडवण्याची ही सुवर्णसंधी आहे. सर्वच नेतेमंडळींनी मतदार बंधू-भगिनींना देवदर्शनाला घेऊन जाऊन
पवित्र अशा नवरात्रीच्या उत्सवामध्ये लवकरात लवकर देवदर्शन घडवून भाग्य मिळवावे.
*समस्त दूध उत्पादकांचा अपमान……!*
माजी आमदार श्री. के. पी. पाटील म्हणाले, विरोधी आघाडीचे नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांची किंमत तीन हजार रुपये करून ते अपमान करीत आहेत. ही पाकिटे आम्हाला मानणाऱ्या मतदारांनाच देण्याचा त्यांचा प्रचंड खटाटोप सुरू आहे. त्यांनी तयार केलेली यादी पूर्णपणे आम्हाला मिळालेली आहे.
अर्जुनवाडा
यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, केडीसीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, धैर्यशील पाटील- कौलवकर यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.
……….
*अर्जुनवाडा (ता. राधानगरी): येथे महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील व समोर उपस्थित ठरावधारक.*
============



