*विरोधकांचा श्रेयवादी अहंकार सभासदच मोडीत काढतील* *आमदार विनय कोरे यांचा घनाघात* *विरोधक म्हणजे फेक नरेटीव्हचा बादशाहच*

Spread the news

*विरोधकांचा श्रेयवादी अहंकार सभासदच मोडीत काढतील*
*आमदार विनय कोरे यांचा घनाघात*

­

 

*विरोधक म्हणजे फेक नरेटीव्हचा बादशाहच*

  •  

कोल्हापूर, दि. १४:
इतरांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची विरोधकांची प्रवृत्ती आहे. त्यांचा हा अहंकार यावेळी सभासद मोडीत काढतील. सहकारामध्ये अहंकारापेक्षा विनय महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत विरोधकांना याचा धडा मिळेल, असा जोरदार घनाघात आमदार विनय कोरे यांनी केला. शाहूवाडी आणि पन्हाळ्याचा गड अभेद्य असून येत्या दसऱ्याला विजयाचे तोरण उभारूया, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी तालुक्यातील ठराव धारकांचा मेळावा कोतोली फाटा इथल्या लक्ष्मी पॅलेस हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ नेते अरुण नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, माझ्या मतदारसंघातील सर्व ठरावधारक एकजुटीने छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये पोटशुळ उसळला असून बेताल वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ आश्वासने देऊन निवडणूक जिंकता येत नाही, त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विरोधक केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

ज्येष्ठ नेते अरुण नरके म्हणाले, गोकुळ दूध संघ ही सर्वसामान्य दूध उत्पादकांची संस्था आहे. ही संस्था राजकारणाचा अड्डा बनवण्याचे पाप विरोधक करत आहेत. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी गोकुळचा वापर करू नका.

*फेक नरेटीव्हचा बादशाह….!*
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ज्यांनी स्वतःच्या साखर कारखान्यातील हजारो सभासद रातोरात कमी करून कारखाना खाजगी करण्याचा डाव आखला आहे त्यांनाच आता गोकुळच्या सभासदांचा पुळका आला आहे. पण त्यांचे हे पूतना मावशीचे प्रेम सभासद पुरते ओळखून आहेत. म्हणूनच या निवडणुकीत २५-० ने छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा विजय निश्चित आहे. प्रत्येक निवडणुकीत फेक नॅरेटीव्ह पसरवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणाऱ्या विरोधकांना आता ठराव धारकच त्यांची जागा दाखवतील, असा टोलाही त्यांनी लगावला. आजच्या मेळाव्याला ठराव धारकांनी लावलेली उपस्थिती विजयाची ग्वाही देणारी आहे अशा भावना व्यक्त केल्या.

या मेळाव्याला माजी खासदार संजय मंडलिक, आमदार संजयबाबा घाटगे, राजेश पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासह छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………..

*कोतोली: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना आमदार डाॅ. विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, अरुणराव नरके व उपस्थित ठराव धारक.*
========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!