*गडहिंग्लजचे स्मार्ट मीटरचे काम राज्यात पथदर्शी – धनंजय औंढेकर*
*महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांचा कर्मचाऱ्यांशी संवाद*
*कोल्हापूर, दि.१७ ऑक्टोबर २०२६ :* कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज विभागाने १०० टक्के स्मार्ट मीटर बसवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे यश फार मोठे असून राज्यातील इतर जिल्ह्यांना हे काम पथदर्शी आहे. विभागातील जनमित्र ते कार्यकारी अभियंता यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे. कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच आपले वेगळेपण जपले असून कर्मचाऱ्यांची चिकाटी व येथील ग्राहकांचे सहकार्य यामुळे राज्यात १०० टक्के स्मार्ट मीटर बसविणारा पहिला जिल्हा हा कोल्हापुरच असेल, अशा विश्वास महावितरणचे संचालक(संचालन) धनंजय औंढेकर यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात ‘ऊर्जा संवाद’ कार्यक्रमात संचालक(संचालन) धनंजय औंढेकर बोलत होते. यावेळी गडहिंग्लज विभागात १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंते गणपत लटपटे(कोल्हापूर), अमित बोकील(सांगली) व पूनम रोकडे (पायाभूत आराखडा) याप्रसंगी उपस्थित होते.
संचालक(संचालन) धनंजय औंढेकर पुढे म्हणाले, “कर्मचाऱ्यांनी अनेक मोर्चे व आंदोलने यांना सामोरे जात येथील ग्राहकांशी संवादाचे पुल बांधत जिल्ह्यात ८२ टक्के स्मार्ट मीटर बसवले आहेत. यामुळे ग्राहक सेवेत अमुलाग्र बदल होणार असून वीज सेवा अधिक ग्राहकाभिमुख होणार आहेत. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना बिल भरण्याची तारीख भविष्यात निवडीचे स्वतंत्र मिळाणार आहे. येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा १०० टक्के वीज देणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील अग्रगण्य जिल्हा असेल, असा विश्वास संचालक(संचालन) धनंजय औंढेकर यांनी व्यक्त केला.
आज अखेर राज्यात सुमारे एक कोटी ४० लाख स्मार्ट मीटर बसवले आहेत. अजून सुमारे एक कोटी मीटर बसवायचे आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुढील टप्प्यात ग्राहकांशी करंट लिकेज, आर्थिंग आदि बाबींवर तर वीज कर्मचाऱ्यांचे यंत्रणेवरील काम, त्यातील चुका, होऊ शकणारे अपघात याबाबत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संवाद साधणे नियोजित आहे. तर प्रशासनास राज्याचा विजेचा वापर, त्याचे ट्रेंड, वीजचोरी आदीं बाबींवर काम करणे सोयीचे होणार आहे, अशी माहिती संचालक(संचालन) धनंजय औंढेकर यांनी यावेळी दिली.
ग्राहक सेवा महत्वाची असून सेवा मानकांनानुसार ग्राहक सेवा द्या, नादुरुस्त रोहित्र २४ तासात बदलणे आदी कामे प्राधान्याने करा, असे आदेश संचालक(संचालन) धनंजय औंढेकर यांनी यावेळी दिले. यावेळी जनमित्र सोमनाथ मगर, शाखा अभियंता कृष्णा कोळी, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरीकट्टी यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव आबिटकर यांनी केले. बैठकीपूर्वी संचालक(संचालन) धनंजय औंढेकर यांनी श्री अंबाबाई मंदिर येथे उभारण्यात आलेल्या सेवा सेतू कॅम्पला भेट दिली.
*सोबत फोटो : गडहिंग्लज विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव करताना संचालक(संचालन) धनंजय औंढेकर, सोबत मान्यवर.*



