*कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा*
*मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणी*
मुंबई, दि. ३:
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, परिस्थितीची दाहकता लक्षात घेऊन कागल तालुका तातडीने ‘दुष्काळग्रस्त’ म्हणून जाहीर करावा, अशी आग्रही मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी मुंबईत महसूलमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात मंत्री मुश्रीफ यांनी नमूद केले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, पन्हाळा आणि गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कागल तालुक्यातही या सहा तालुक्यांप्रमाणेच तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. श्री. मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे, कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, पन्हाळा, गगनबावडा या सहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. कागल तालुक्यासह उर्वरित सहा तालुक्यांमध्येही अशीच दुष्काळग्रस्त स्थिती आहे. पावसाअभावी पिके करपून गेली असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच कागलमधील शेतकरीही या नैसर्गिक संकटाने मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शासनाने कागल तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत, कर्जवसुलीला स्थगिती, पीक नुकसान भरपाई व इतर सवलती लागू कराव्यात, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे.
यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन देताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या मागणीवर महसूलमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
………….
*मुंबई: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीचे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. यावेळी माजी आमदार राजेश पाटील व इतर.*
======



