शेतकऱ्यांच्या_सोयीसाठी_तंत्रज्ञानाचा_वापर_व्हावा; तंत्रज्ञानामुळे_शेतकऱ्यांची_गैरसोय_होऊ_नये.
महाराष्ट्र शासनाच्या खत ऑनलाइन नोंदणी व वितरण(FFS ) प्रणालीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करून पर्यायी व सुलभ व्यवस्था निर्माण करण्याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस किसान कमिटीच्या वतीने आम. बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी गुरव साहेब निवेदन स्विकारताना. यावेळी जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले की,
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या खत ऑनलाइन नोंदणी व वितरण प्रणालीमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने खातेफोड न झाल्यामुळे क्षेत्र मर्यादेनुसार खत मिळण्यात येणाऱ्या अडचणी, पीक पाहणीमध्ये प्रत्यक्ष लागवड केलेल्या पिकाची नोंद अद्ययावत नसणे, सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना खत नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, कुळ म्हणून वहिवाट असणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच फाळ्यावर (वाटेकरी) शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणारी गैरसोय इ.
याशिवाय ऑनलाइन प्रक्रियेबाबत माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून खत विक्री केंद्रांवर तासन्तास थांबावे लागत आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होणे आणि तांत्रिक अडचणींमुळे खत खरेदी प्रक्रियेत विलंब होत असून शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाया जात आहेत.
शेतीचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा असल्याने खत उपलब्धतेअभावी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आपण या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कृषी विभाग व खत वितरण यंत्रणेला आवश्यक सूचना द्याव्यात.
आपण या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तौफिक मुल्लानी, विनायक घोरपडे, संजय वाईकर, संपतराव पाटील, रणजीत खतकर, प्रशांत निंबाळकर, सर्जेराव पाटील इ.
सोमवार ,दि 23, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर