आसमा तर्फे ‘ॲड गुरु’ पियुष पांडे यांना श्रद्धांजली
कोल्हापूर : आपली अप्रतिम दूरदृष्टी, विनोदबुद्धी आणि कथाकथनाच्या विलक्षण प्रतिभेने भारतीय जाहिरात क्षेत्राचे स्वरूप बदलणारे ॲड गुरु पियुष पांडे यांचे निधन झाले. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन (आसमा) तर्फे भारतीय जाहिरात क्षेत्रातील या दिग्गज व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय संस्कृती आणि भावना समजून घेऊन सामान्य माणसाच्या भाषेत जाहिरातींना वेगळी ओळख देणारे पियुष पांडे यांनी भारतीय जाहिरातविश्वाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिले. “दो बूंद जिंदगी के” या पल्स पोलिओ मोहिमेपासून ते “मिले सुर मेरा तुम्हारा” या एकात्मतेच्या गीतापर्यंत आणि “चल मेरी लुना” पासून “हर घर कुछ कहता है’ या एशियन पेन्ट्स जाहिरातींपर्यंत त्यांच्या कल्पकतेने भारतीय जाहिरात इतिहासात अमिट ठसा उमटवला असे प्रतिपादन अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी केले. “पियुष पांडे हे फक्त जाहिरात जगतातील आयकॉन नव्हते, ते भारतीय सर्जनशीलतेचे धडधडते हृदय होते. कॅडबरी, फेविकॉल, एशियन पेंट्स, टायटन, पॉन्ड्स अशा असंख्य ब्रँडसाठी त्यांनी तयार केलेल्या जाहिराती आजही जनमानसात घर करून आहेत असे” सचिव शिरीष खांडेकर म्हणाले. “ पियुष पांडे यांच्या कामाने केवळ ब्रँड घडवले नाहीत, तर संपूर्ण पिढीला सर्जनशीलतेचा नवा दृष्टिकोन दिला. भारतीय जाहिरात क्षेत्राचा आत्माच त्यांनी नव्याने परिभाषित केला. उद्योगक्षेत्राने एक दिशादर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे” अशा शब्दात जाहिरातदारांचे राज्य फेडरेशन असलेल्या फेमचे खजिनदार कौस्तुभ नाबर यांनी शोक व्यक्त केला. “पियुष पांडे यांनी भारतीय जाहिरातींना आत्मा दिला. त्यांच्या कल्पकतेत भारतीयता आणि जागतिक दर्जा यांचा सुंदर संगम होता. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि भावनांच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधण्याची जादू निर्माण केली. त्यांची प्रेरणा प्रत्येक जाहिरातदारासाठी कायम जिवंत राहील.” अशा शब्दात फेमचे संचालक सुनील बासरानी यांनी श्रद्धांजली वाहिली. आसमा सभासदांकडून या महान व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन करण्यात आले.




