खबरदार! ओळख दाखवाल तर शिक्षा अटळ..!

Spread the news

खबरदार! ओळख दाखवाल तर शिक्षा अटळ..!

­

 

विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची व्हिडिओद्वारे व्यापक जागृती.

  •  

परीक्षा पूर्व, परीक्षा कालावधी आणि परीक्षोत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई.

दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे स्वतःची ओळख दर्शवू नये, अन्यथा संबंधित विषयाची संपादनूक रद्द होऊन परीक्षार्थी अनुत्तीर्ण ठरेल, असा कडक इशारा विभागीय मंडळाने दिला आहे. उत्तरपत्रिकेत नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, शाळेचे, केंद्राचे किंवा गावाचे नाव लिहिणे, ठरलेल्या जागेशिवाय बैठक क्रमांक लिहिणे, विशिष्ट चिन्हे, खुणा, संदेश, प्रार्थना, विनंती, चित्र, ओळख पटवणारी कोणतीही बाब लिहिणे ही गंभीर गैरमार्गाची कृती समजली जाणार असून त्यावर शिक्षासूचीनुसार कठोर शिक्षा केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जानेवारी २०२० पासून सुधारित “परीक्षार्थी गैरमार्ग – शिक्षा सूची” लागू केली असून त्यात एकूण ३२ प्रकारच्या गैरमार्गांचा आणि त्यावरील शिक्षांचा सविस्तर समावेश आहे. या शिक्षासूचीत परीक्षा पूर्व काळ, परीक्षा कालावधी आणि परीक्षोत्तर काळात घडणाऱ्या सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना स्वतंत्रपणे वर्गीकृत करण्यात आले आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळाची व्यापक मोहीम-
मागील दोन वर्षांत कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. पूर्वी शेकडोंच्या संख्येने आढळणारे कॉपीचे प्रकार जवळपास शून्यावर आणण्यात यश आले आहे. यासाठी मंडळ नियमावलीची कडक अंमलबजावणी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी बोर्ड परीक्षेचा राजमार्ग पुस्तिका, परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्हीद्वारे निगराणी, संवेदनशील केंद्रावर ड्रोन द्वारे निगराणी, भरारी व बैठकी पथके यांच्या जोडीला शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षासूचीचे प्रकट वाचन, कॉपीमुक्त अभियान जागृती सप्ताह, व्हिडिओ संदेश, तसेच राज्यस्तरीय जनजागृती उपक्रम असे शिक्षा सूचीबाबत महत्त्वपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

यंदाही मंडळाने परीक्षेशी संबंधित विविध विषयांवर छोटेखानी माहितीपर व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर उपलब्ध करून दिले आहेत. शिक्षासूचीबाबत जागृती व्हावी, नकळत होणारे गैरप्रकार टळावेत आणि विद्यार्थ्यांना नियमांची स्पष्ट माहिती मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

उत्तरपत्रिकेत ओळख दर्शविणे म्हणजे थेट गैरमार्ग.शिक्षासूचीत स्पष्ट नमूद केल्याप्रमाणे उत्तरपत्रिकेत खालील बाबी आढळल्यास ती गंभीर चूक मानली जाते:
विशिष्ट खुणा, चिन्ह, रेखाचित्र, कोड किंवा संदेश लिहिणे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा शाळेचे नाव लिहिणे, उत्तर पत्रिकेवर प्रथम पृष्ठावर ठरलेल्या जागेशिवाय अन्यत्र बैठक क्रमांक लिहिणे,परीक्षकाला उद्देशून विनंती, शुभेच्छा किंवा संदेश लिहिणे,स्वतःची ओळख पटेल अशी कोणतीही खूण करणे,अशा प्रकारे ओळख पटविण्याचा प्रयत्न हा परीक्षेतील निष्पक्षतेला बाधा आणणारा गैरमार्ग मानला जातो आणि संबंधित विषयाची संपादनूक रद्द केली जाते.

परीक्षा पूर्व काळातील गैरमार्गांवर कडक तरतूद
शिक्षासूचीत परीक्षा सुरू होण्यापूर्वीच घडणाऱ्या गैरप्रकारांवरही कठोर कारवाईची तरतूद आहे. त्यामध्ये –बनावट कागदपत्रे सादर करणे
अर्जातील खोटी माहिती देणे
चुकीचा फोटो/ओळखपत्र वापरणे,दुसऱ्याच्या वतीने परीक्षा देण्याचा प्रयत्न
प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा संदर्भातील गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न
अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्याला परीक्षेत बसण्यास प्रतिबंध, परीक्षा रद्द किंवा दीर्घकालीन प्रतिबंधाची शिक्षा होऊ शकते.

परीक्षा कालावधीत होणारे प्रमुख गैरप्रकार-
परीक्षा सुरू असताना आढळणाऱ्या गैरमार्गांमध्ये खालील प्रकारांचा समावेश होतो:
कॉपी करणे किंवा कॉपीस मदत करणे,चिट, नोट्स, मार्गदर्शिका, इलेक्ट्रॉनिक साधने वापरणे.प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण करणे
अन्य विद्यार्थ्याशी बोलणे, संकेत देणे. धमकी, गोंधळ किंवा दडपण निर्माण करणे
प्रश्नपत्रिकेवर किंवा उत्तरपत्रिकेवर अनधिकृत लिखाण ,उत्तरपत्रिका फाडणे, पाने नष्ट करणे
अशा प्रकरणांमध्ये संपूर्ण परीक्षा रद्द, संबंधित विषय रद्द किंवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

परीक्षोत्तर गैरप्रकारही गंभीर गुन्हा-
मंडळाने विशेषतः परीक्षेनंतर उघडकीस येणाऱ्या गैरप्रकारांबाबतही कठोर भूमिका घेतली आहे.
शिक्षासूचीत नमूद केल्याप्रमाणे खालील कृती गंभीर गुन्हा मानल्या जातात:
उत्तरपत्रिका किंवा पुरवणी अनधिकृतपणे सोबत घेऊन जाणे,उत्तरपत्रिकेत फेरफार करणे,इतर व्यक्तीकडून उत्तर लिहून घेणे,परीक्षकांशी अनधिकृत संपर्क साधणे, प्रमाणपत्र, गुणपत्रिका किंवा दस्तऐवजांमध्ये बदल करणे,
सुनावणीस हजर न राहणे,
उत्तरपत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात नसणे
या प्रकारांमध्ये संबंधित विषय किंवा संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द करण्याची तरतूद आहे.

गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिस व सायबर कारवाई-
शिक्षासूचीत काही गैरप्रकारांना दंडनीय गुन्ह्याचे स्वरूप देण्यात आले आहे. उदाहरणार्थ:
प्रश्नपत्रिका लीक करणे किंवा प्रसारित करणे,
उत्तरपत्रिका कार्यालयाबाहेर नेणे,उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड
डिजिटल माध्यमातून गैरमार्ग (सायबर गैरप्रकार)
लाच देणे किंवा दडपण आणणे
अशा घटनांमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल करणे, सायबर कायद्यांतर्गत कारवाई आणि दीर्घकालीन परीक्षा बंदी लागू शकते.

सामूहिक व सहाय्यक गैरप्रकारांवरही शिक्षा-
शिक्षासूचीत केवळ परीक्षार्थीच नव्हे तर सहाय्य करणाऱ्यांवरही कारवाईची तरतूद आहे. त्यात:
कॉपीस मदत करणारे विद्यार्थी
अनधिकृत साहित्य पुरवणारे
उत्तर सांगणारे किंवा संकेत देणारे बाहेरील व्यक्तींचा सहभाग
या सर्वांवर संपूर्ण परीक्षा रद्द किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कठोर शिक्षांचा विस्तृत आवाका-
मंडळाच्या नियमावलीनुसार खालील शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे:
संबंधित विषयाची संपादनूक रद्द
संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द
पुढील परीक्षेस बसण्यास प्रतिबंध पाच वर्षांपर्यंत परीक्षा बंदी,पोलिसात गुन्हा नोंद,
सायबर कायद्यान्वये कारवाई,
सक्षम समितीद्वारे अतिरिक्त शिक्षा,शिक्षासूचीत नमूद नसलेल्या गंभीर प्रकरणांबाबत शिक्षा निश्चित करण्याचे अधिकार विभागीय मंडळाच्या सक्षम समितीकडे राखीव आहेत.

विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट संदेश: “नकळत चूकही महागात पडू शकते”मंडळाने स्पष्ट केले आहे की काही गैरप्रकार विद्यार्थ्यांकडून नकळत होतात, जसे की उत्तरपत्रिकेत विनंती लिहिणे, चिन्ह काढणे किंवा अतिरिक्त माहिती नमूद करणे. मात्र नियमांनुसार अशा कृतींनाही गैरमार्ग मानले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता, निष्पक्षता आणि कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी मंडळाने शिक्षासूचीद्वारे कठोर पण स्पष्ट नियम लागू केले आहेत. उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे ओळख दर्शविणे, अनधिकृत साहित्य वापरणे, परीक्षेनंतर फेरफार करणे किंवा कोणताही गैरमार्ग अवलंबणे यामुळे केवळ विषयच नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे परीक्षा देणे, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांपासून दूर राहणे आणि मंडळाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे हाच सुरक्षित व यशस्वी मार्ग असल्याचा पुनरुच्चार मंडळाने केला आहे.

“जागरूकतेमुळे गैरप्रकारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
वर्षभर राबविण्यात येणाऱ्या जागृती उपक्रमांमुळे परीक्षा पूर्व व परीक्षा कालावधीत होणारे गैरप्रकार जवळपास संपुष्टात आले आहेत. आता परीक्षोत्तर गैरप्रकारही कमी व्हावेत यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!