भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

Spread the news

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

­

 

भुये (ता. करवीर) – जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त भुये (ता. करवीर) येथील मानाची सासनकाठी क्रमांक ४० यंदा पर्यावरणपूरक उपक्रमामुळे विशेष चर्चेत आली. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले.

  •  

सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र वाडी-रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे चैत्र यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सर्व मानाच्या सासनकाठ्यांनी यात्रेत सहभाग घेतला; मात्र सासनकाठी क्रमांक ४० ने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वेगळी ओळख निर्माण केली.

प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, सासनकाठीच्या मानकऱ्यांनी “पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार दुपारी सुमारे ३ वाजता सासनकाठीची बारी सुरू होताच, काठी क्रमांक ४० सोबत भुये गावच्या भाविकांनी पर्यावरण जनजागृतीचे फलक हातात घेत यात्रेत सहभाग घेतला.

फलकांवर “जंगलतोड रोखू, पर्यावरण वाचवू”, “प्लास्टिकमुक्त व केमिकलमुक्त चैत्र यात्रा साजरी करू”, “कापडी पिशवीचा वापर करा”, “लावा झाडे, वाचवा पुढची पिढी”, “वनवा पेटवू नका” अशा संदेशांद्वारे भाविकांचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी सासनकाठी परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप करून परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. तसेच भाविकांनी “चांगभलं – मानाची सासनकाठी नंबर ४०” असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान करून उपक्रमात सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सासनकाठी क्रमांक ४० जवळ भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सासनकाठी नाचवून या उपक्रमास प्रोत्साहन दिले. तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागातील प्रतिनिधींनीही या उपक्रमाचे कौतुक करत छायाचित्रे घेतली.

हा उपक्रम सासनकाठीचे मानकरी अमर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी भुये, भुयेवाडी, निगवे, शिये, जठारवाडी या पंचक्रोशीतील जोतिबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, सासनकाठी क्रमांक ४० ने यंदाची चैत्र यात्रा केवळ भक्तिभावानेच नव्हे, तर सामाजिक जाणीव आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवत गाजवली.

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषद चे सीईओ एस कार्तिकेएन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नायकवडी भुये चे बाजीराव पाटील रामचंद्र पाटील रमेश पाटील शिवाजी पाटील तानाजी पाटील सर्जेराव पाटील विश्वास पाटील धनाजी पाटील प्रणव पाटील निलेश पाटील विष्णू पाटील ओंकार पाटील आदी मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!