- *सुरेश शिपुरकर, शैलजा साळोखे यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर*8
*कोल्हापूर :* ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ टेबल टेनिस खेळाडू श्रीमती शैलजा साळोखे यांना यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश मिळविलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंतांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते शनिवार दि.18 ऑक्टोबर रोजी निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार असल्याची माहिती ब्रँड कोल्हापूर समिती सदस्यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूरच्या अनेक सुपत्रांनी कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकिक जागतिक पातळीवर केला आहे. नव्या पिढीनेही ही परंपरा जपली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील या सुपुत्रांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने ‘ब्रँड कोल्हापूर’ हा सन्मान देण्याचा उपक्रम सुरु आहे. पुरस्काराचे यंदाचे 6 वे वर्ष आहे. दिवाळीच्या सणा दरम्यान सर्व मान्यवर हे आपल्या घरी असतात, त्यामुळे त्यादरम्यान हा उपक्रम घेतला जातो. विशेष म्हणजे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी वरीष्ठ पातळीवर काम केलेले कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र असणारे आजी-माजी अधिकारी यांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाते. आजपर्यंत डॉ. ज्ञानेश्वर मुळे, भूषण गगराणी, विकास खारगे, हेमंत निंबाळकर, सुनिल लिमये हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले होते. या वर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते होणार आहे.
या वर्षी पॅरीस ऑलंपिक ब्रॉन्झ पदक प्राप्त स्वप्निल कुसाळे, बिरदेव डोणे यांच्यासह युपीएससी परीक्षेतील यशस्वी गुणवंत, दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन मधील यशस्वी धावपटू, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवर यांच्यासह कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होणार आहे. ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य अजेय दळवी, चेतन चव्हाण, अनंत खासबारदार, भरत दैनी, डॉ. अमर आडके, प्राचार्य डॉ. महादेव नरके, अनुराधा कदम, विनायक पाचलग, संग्राम भालकर, ऐश्वर्य मालगावे, डॉ. राजेंद्र रायकर, सचिन लोंढे-पाटील यांनी ही माहिती दिली.