खेळाडूंच्या भविष्यासाठी उभारणार ब्रँड कोल्हापूर मोठा निधी
आमदार सतेज पाटील यांची घोषणा
पाच लाखाने केली सुरुवात
सुरेश शिपुरकर शैलजा साळोखे यांना गौरव पुरस्कार केला प्रधान
कोल्हापूर, प्रतिनिधी
यशावर नुसत्या टाळ्या न वाजवता खेळाडूंच्या भविष्यासाठी मोठा निधी उभारण्याचा संकल्प ब्रँड कोल्हापूर या व्यासपीठाने केला आणि त्याची सुरुवात आमदार सतेज पाटील यांनी पाच लाखांनी केली. ही संकल्पना मांडताना नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनीही एक लाख रुपये देण्याची घोषणा केली.
आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केलेल्या ब्रँड कोल्हापूर या व्यासपीठाच्या वतीने सुरेश शिरपूरकर आणि शैलजा साळुंखे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान यशवंत थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी गेल्या दोन वर्षात कोल्हापूरचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यात चांगले खेळाडू घडावेत, केवळ आर्थिक कारणामुळे त्यांना अडचणी येऊ नयेत, भविष्यातही त्यांना आर्थिक समस्याला तोंड द्यावे लागू नये म्हणून मोठा निधी उभारण्याची संकल्पना थोरात यांनी मांडली. त्याला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेष्ठ टेबल टेनिसपटू शैलजा भोसले यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पॅरीस ऑलिंपिकमध्ये रोप्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे, साहित्यिक कृष्णात खोत, यूपीएससी परीक्षेतील गुणवंत बिरदेव डोणे यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री.बाळ पाटणकर, जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, रविंद्र ओबेरॉय, डॉ.बी. एम. हिर्डेकर, सुधाकर काशीद, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉ आर. एम. कुलकर्णी , रोटरीचे शीतल दुग्गे, निसर्गमित्रचे अनिल चौगले,पद्मा तिवले,अविनाश शिरगावकर, ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.