विभागीय मंडळाचे अध्यक्षच बनले परीक्षार्थी!
बारावीच्या ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकारांना ‘डिजिटल’ लगाम.
स्क्रीन रेकॉर्डिंग, ॲप ब्लॉकिंग, त्रयस्थ पर्यवेक्षक अन् सीसीटीव्ही निगराणी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये आयोजित बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्यज्ञान (GK) या विषयांच्या ऑनलाईन परीक्षांसाठी कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने अभूतपूर्व आणि कडक सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. परीक्षेत पारदर्शकता टिकावी आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांना मुळासकट उपटून टाकता यावे, यासाठी यंदा प्रथमच ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’, ॲप ब्लॉकिंग आणि ‘त्रयस्थ पर्यवेक्षक’ यांसारखी पावले उचलण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेची खातरजमा करण्यासाठी कोकण-कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वतः एका परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून विद्यार्थ्याप्रमाणे ‘डेमो एक्झाम’ दिली. चालू वर्षी करण्यात आलेले सर्व तांत्रिक बदल त्यांनी स्वतः हाताळून पाहिले असून, कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हानिहाय परीक्षार्थी आणि केंद्र
कोल्हापूर आणि कोकण विभागांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो, तर कोकण विभागीय मंडळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. आयटी विषयाची परीक्षा बहुतांशी मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांतच होणार असली तरी, कोल्हापूर विभागात दोन आणि कोकण विभागात तीन ठिकाणी अपवाद म्हणून अन्यत्र केंद्रे देण्यात आली आहेत. सामान्यज्ञान (GK) विषयाची परीक्षा मात्र केवळ खासगी सैनिकी शाळांमध्ये होणार असून प्रत्येक जिल्ह्यात यासाठी केवळ एकच मुख्य केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
सांख्यिकीय माहितीचा विचार करता, कोल्हापूर जिल्ह्यात ११२ आयटी परीक्षा केंद्रांवरून १३,२७८ विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावरून ७४ विद्यार्थी अशी एकूण १३,३५२ मुले परीक्षा देतील. सांगली जिल्ह्यात ५५ आयटी केंद्रांवरून ४,५७० विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावरून २८ विद्यार्थी असे एकूण ४,५९८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. सातारा जिल्ह्यात ७६ आयटी केंद्रांवरून ८,३६० विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावरून २ विद्यार्थी असे एकूण ८,३६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ५० आयटी केंद्रांवर ३,१४१ विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावर ३८ विद्यार्थी अशी एकूण ३,१७९ संख्या आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ आयटी केंद्रांवर १,९९४ विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावर ४० विद्यार्थी असे एकूण २,०३४ विद्यार्थी ही ऑनलाईन परीक्षा देतील. अशाप्रकारे संपूर्ण कोल्हापूर शैक्षणिक विभागात ३२२ आयटी केंद्रांवर ३१,३४३ विद्यार्थी आणि ५ जीके केंद्रांवर १८२ विद्यार्थी असे एकूण ३१,५२५ परीक्षार्थी आपले नशीब अजमावणार आहेत.
कडक तांत्रिक निर्बंध आणि ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’चा प्रयोग-
गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी मंडळाने यावर्षी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या संगणकावरील स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार असून, त्याची फाईल संगणकाच्या ‘सी’ ड्राईव्हमध्ये जतन केली जाईल. यासाठी प्रत्येक संगणकावर किमान ३ जीबी जागा मोकळी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, परीक्षा कालावधीत संबंधित संगणकावर गुगल क्रोम, चॅट जीपीटी, टीम व्ह्यूअर, एनीडेस्क किंवा अल्ट्रा व्ह्यूअर यांसारख्या कोणत्याही अन्य ॲप्लिकेशनचा वापर करता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने असा प्रयत्न केला, तर परीक्षा सॉफ्टवेअरमध्ये अडथळा निर्माण होईल. असे ॲप संगणकावरून काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परीक्षे व्यतिरिक्त अन्य कोणतेही ॲप संगणकावर चालणार नाही. सर्व संगणक प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले असून, त्याचे फुटेज जतन करून ठेवणे मंडळाने बंधनकारक केले आहे.
परीक्षा केंद्रावरील कर्मचारी आणि समन्वयक नेमणुका-
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि तांत्रिक सहाय्यक यांची कर्तव्ये स्पष्ट करण्यात आली आहेत. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा उपप्राचार्य हे ‘केंद्र संचालक’ म्हणून काम पाहतील. मात्र, पर्यवेक्षक (Supervisor) हे संबंधित महाविद्यालयातील नसून त्रयस्थ महाविद्यालयातील असतील, ज्यामुळे गैरप्रकारांना मदत करणाऱ्यांवर चाप बसेल. संगणक प्रयोगशाळेतील आयटी शिक्षक ‘तांत्रिक सहाय्यक’ म्हणून काम करतील, परंतु त्यांना केवळ तांत्रिक अडचण आल्यासच लॅबमध्ये प्रवेश दिला जाईल; अन्यथा त्यांना लॅबबाहेर राहणे अनिवार्य आहे.
परीक्षेच्या तांत्रिक मदतीसाठी विभागीय समन्वयक म्हणून श्रीमती सुषमा पाटील (कोल्हापूर) आणि श्री. सचिन नाईक (कोकण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर सातारा जिल्ह्यासाठी विशाल शिंदे, किरण शिंदे, सांगलीसाठी धनाजी येवडे, शांतीनाथ पाटील, कोल्हापूरसाठी वायकसकर, ज्योती गडगे, निलेश कांबळे, रत्नागिरीसाठी समृद्धी बावधनकर आणि सिंधुदुर्गसाठी प्रसन्नकुमार मयेकर हे समन्वयक म्हणून परीक्षा कालावधीत तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देतील.
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि वेळापत्रक-
माहिती तंत्रज्ञान (IT) विषयाची परीक्षा १२, १३ आणि १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १.४० आणि दुपारी ३ ते ५.४० या दोन सत्रांत होईल. यामध्ये रिकाम्या जागा भरा, चूक की बरोबर, बहुपर्यायी प्रश्न आणि कोडिंगवर आधारित प्रश्न विचारले जातील. सामान्यज्ञान (GK) विषयाची परीक्षा १६, १७ आणि १८ मार्च २०२६ रोजी होईल. ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ (Objective) असून १०० गुणांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल. लेखी परीक्षेप्रमाणेच ऑनलाईन परीक्षेसाठीही १० मिनिटांचा जादा वेळ समाविष्ट करण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गाप्रमाणे जादा वेळेची सवलत दिली जाईल. परीक्षा आयोजनाबाबतच्या सर्व लेखी सूचना कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले आणि कोकण विभागीय सचिव पुनीता गुरव यांनी क्षेत्रीय अधिकारी व केंद्र संचालकांना दिल्या आहेत.
कठोर कारवाईचा इशारा-
परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास सक्त मनाई आहे. जर कोणी गैरप्रकार करताना किंवा त्यात मदत करताना आढळले, तर महाराष्ट्र अधिनियम १९८२ आणि आयटी ॲक्ट २००० नुसार कठोर फौजदारी कारवाई केली जाईल. तोतया परीक्षार्थी आढळल्यास तात्काळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. या कडक नियमांमुळे यंदाची बारावी ऑनलाईन परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडेल, असा विश्वास विभागीय मंडळाने व्यक्त केला आहे. जिल्हास्तरावरून भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आल्या आहेत.
“बारावीची ऑनलाईन परीक्षा लेखी परीक्षेप्रमाणेच गांभीर्याने घेण्यात येईल. गैरप्रकारांना पायबंध घालण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय उपायोजना करण्यात आल्या आहेत.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.







