AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा; बिबट्या हल्ल्यांतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या – आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत जोरदार मागणी
🌾 शाश्वत शेतीसाठी ‘AI फॉर एग्री 2026’ हा नवा टप्पा
चंद्रदीप नरके यांनी आज विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा आणि शाश्वत शेतीचा मुद्दा ठळकपणे मांडला. “AI फॉर एग्री 2026” परिषद ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची ताकद देणारा नवा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कृषीप्रधान महाराष्ट्रात उत्पादनवाढीसाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात ऊस हे प्रमुख नगदी पीक असून राज्यात सुमारे १०७ खाजगी व १३० सहकारी साखर कारखाने कार्यरत आहेत. 2025-26 च्या गाळप हंगामात सुमारे १० कोटी १६ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप झाले असून सरासरी 9.44 टक्के रिकव्हरी नोंदवली गेली. मात्र, अवकाळी पाऊस, पूरस्थिती आणि बदलते हवामान यामुळे उत्पादनात घट होत असून साखर कारखाने आणि शेतकरी दोघेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
नरके यांनी स्पष्ट केले की, Vasantdada Sugar Institute (VSI) आणि Agricultural Development Trust यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस शेतीत AI तंत्रज्ञान वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत:
•प्रति एकर अंदाजे खर्च – ₹२५,०००
•साखर कारखान्यांकडून मदत – ₹६,७५०
•VSI कडून मदत – ₹१८,२५०
•पर्जन्यमापन केंद्रासाठी खर्च – सुमारे ₹२ लाख
AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खत व पाणी व्यवस्थापन अचूकपणे करता येईल, ठिबक सिंचन प्रभावीपणे वापरता येईल आणि जमिनीतील क्षारपड नियंत्रण शक्य होईल. या तंत्रज्ञानामुळे उसाच्या उत्पादनात सुमारे २५ टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज VSI ने व्यक्त केला आहे.
नरके यांनी राज्य सरकारला आवाहन केले की, प्रत्येक शेतकऱ्याला ही प्रणाली बसवता यावी यासाठी अनुदान द्यावे तसेच ५ वर्षांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे.
🐆 बिबट्या हल्ल्यांबाबत कठोर उपाययोजनांची मागणी
राज्यात पुणे आणि नाशिक येथे बिबट्यांसाठी स्वतंत्र संरक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगताना नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या बिबट्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर असून अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यासाठी तातडीने शासन निर्णय (GR) काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच वनविभागामार्फत सौरऊर्जा कुंपण व अन्य संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशीही त्यांनी मागणी केली.
डोंगराळ भागात महावितरण कनेक्शन द्यावे
राज्यात सौरऊर्जा पंप योजना प्रभावी असली तरी करवीर मतदारसंघातील डोंगराळ भागात लांबून पाइपलाइन आणावी लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी सौर पंप कार्यक्षम ठरत नाहीत. अशा भागांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) मार्फत वीज कनेक्शन द्यावे, अशी मागणी नरके यांनी विधानसभेत केली.