- *कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्नांची निर्गत लवकरात लवकर करा- आमदार अमल महाडिक यांच्या सूचना; महानगरपालिकेत पार पडली बैठक*
कोल्हापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न महापालिकेच्या वतीने सुरू असलेली विकास कामे आणि इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत कोल्हापूर महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. कोल्हापूर शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातील रस्ते आणि चौक अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. नगरोत्थानमधून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची माहिती घेत असताना आमदार महाडिक यांनी शहराच्या उपनगरांमधील रस्त्यांकडेही लक्ष देण्याची मागणी केली. त्याचबरोबर शहराच्या वाढीव गावठाणातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्शा योजनेतून ड्रोनसर्वेचे काम कुठपर्यंत आले? अशी विचारणा महाडिक यांनी केली. यावर नगररचना विभागाकडून 92 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कडे पाठवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदारांनी दिली. शहरांतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा अत्याधुनिक बनवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या समन्वय बैठक घेण्याची सूचना महाडिक यांनी केली. अमृत योजनेतून शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना आमदार महाडिक यांनी कामाचे टप्पे तयार करून प्रभागनिहाय कामे पूर्ण करावीत संपूर्ण शहरभर अर्धवट कामे ठेवू नयेत असे आमदार अमल महाडिक यांनी सुनावले. महानगरपालिकेच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तसेच शासन स्तरावरून यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असेही आमदार महाडिक यांनी सांगितले. जरग नगर येथील लक्ष्मीबाई जरग विद्यालयाच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार महोदयांनी दिली. कोल्हापूर शहरातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पुलांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महाडिक यांनी दिल्या. पीएम ई बस योजनेअंतर्गत शंभर ई बसेसची खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून केलेली मागणी अंतिम टप्प्यात आहे आणखी 50 बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच केएमटीकडील सद्यस्थितीत सुरू असलेल्या बसेसची आयुर्मर्यादा लक्षात घेता सीएनजीवरील बसेस खरेदी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही अमल महाडिक यांनी दिली. ही बसेसच्या चार्जिंगसाठी शिरोली एमआयडीसी येथील केएमटी च्या जागेत चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे असे आयुक्तांनी सांगितले. गांधीनगर येथील केएमटी च्या जागेवर व्यापारी संकुल आणि बस डेपो उभारण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. शहरातील झोपडपट्टी धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीसाठी महापालिकेकडून व्यापक प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा आमदार महाडिक यांनी व्यक्त केली. शहरातील भटक्या जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शहरालगतच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. तसेच यासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन आमदार महाडिक यांनी केले. शहरातील पांजरपोळ संस्थेची जागा मोकाट जनावरांसाठी अपुरी पडत असून शेजारील महानगरपालिकेची एक एकर जागा या जनावरांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी नमूद केले. यावर विविध दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून भटक्या जनावरांसाठी सुसज्ज निवारा उभारण्याची तयारी आमदार महाडिक यांनी दर्शवली. शहराचा तिसरा सुधारित विकास आराखडा लवकरात लवकर तयार करावा जेणेकरून भविष्यकालीन तरतुदी करणे सोपे जाईल. तसेच शासन स्तरावरून मोठा निधी आणण्यास सहकार्य होईल असेही ते म्हणाले. यावर एक महिन्यात हा विकास आराखडा पूर्णत्वाला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती आमदार महाडिक यांनी जाणून घेतली . कचरा उठावासाठी यंत्रणा अपुरी पडत आहे त्यामुळे नवीन टिपर खरेदीसाठी प्रयत्न सुरू आहेत असे आयुक्तांनी नमूद केले. त्यासंदर्भात लवकरच पालकमंत्री महोदय आणि नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. शहर आणि उपनगरातील महानगरपालिकेच्या ताब्यातील ओपन स्पेस च्या विकासासाठी आराखडा बनवण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी केल्या. महानगरपालिकेच्या मालकीच्या हेरिटेज इमारतींना निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहरातील बगीच्यांच्या विकासासाठी विविध कंपन्यांनी सीएसआर फंड उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासंदर्भात आराखडा तयार करावा असेही ते म्हणाले. येत्या महिनाभरात या सर्व कामांचा आढावा घेऊन दर महिन्याला कामांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने बैठका घेण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे*
1. शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त करणार
2. शहरांतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणार
3. महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सीएसआर फंडातून आणि शासन स्तरावरून निधी जमवणार
4. पी एम ई बस योजनेअंतर्गत आणखी 50 बसेस साठी केंद्राकडे पाठपुरावा करणार तसेच सीएनजी वरील बसेस खरेदीसाठी निधी उपलब्ध करणार
5. शहरातील झोपडपट्टी धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीसाठी महापालिका स्तरावर व्यापक प्रयत्न केले जाणार
6. शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी पांजरपोळ संस्थेला नवी जागा उपलब्ध करून देणार तसेच दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निवारा शेडची उभारणी करणार
7. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आराखडा बनवून नवीन टिप्पर खरेदीसाठी प्रस्ताव सादर करणार
8. महानगरपालिकेच्या मालकीच्या हेरिटेज इमारतींना निधी उपलब्ध करून देणार
9. महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या ओपन स्पेसमध्ये उद्याने, क्रीडांगणे विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाणार.