*मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत घातले लक्ष*
कोल्हापूर दिनांक 27 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच सुरू होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज नामदार चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरातील नगरसेवकांच्या भेटी घेतल्या.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रा.जयंत पाटील, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती.
भाजपा सक्षमपणे महानगरपालिका निवडणुकीत मागील वेळच्या विजयी 33 जागांवर आग्रही राहत व अन्य ठिकाणी सक्षम उमेदवार असतील तेथे महायुतीकडून आणखीन जागा मागून घेऊन कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करणार असा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रमुख पदाधिकारी व सर्व नगरसेवकांनी केंद्रात व राज्यात आपली सत्ता असल्यामुळे यावेळी महानगरपालिकेत देखील आपली सत्ता आणल्यास कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यास सहाय्यभूत ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधून मतदार संघाचा आढावा घेतला तसेच कोल्हापूर महानगरपालिकेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन महायुतीचा महापौर होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या असल्याचे अधोरेखित केले.