Spread the news

बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी संजय पुराणिक
नियुक्त्या जाहीर : तीन वर्षासाठी असेल कालावधी

कोल्हापूर : राज्यातील बालकांचे हक्क व अधिकाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी सजग असणाऱ्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी तळोदा नंदूरबार येथील ॲड संजय विष्णू पुराणिक यांची महिला व बालविकास विभागाने बुधवारी नियुक्ती केली. त्यांच्यासह सात सदस्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या बालविकास चळवळीतील कार्यकर्ते अतूल देसाई यांचाही समावेश आहे.

­

 

या आधीच्या अध्यक्षा मुंबईच्या सुशीबेन शहा यांची मुदत मे २०२५ मध्ये संपल्याने विभागाने आयोगाच्या सदस्यांसाठी अर्ज मागवले होते. राज्यभरातून त्यासाठी सुमारे साडेतीनशेवर अर्ज आले होते. राज्यभर कार्यक्षेत्र असलेला या आयोगास निम्नन्यायिक स्वरुपाचा दर्जा आहे. कायद्यांची अंमलबजावणी करून शासनाला बालकांच्या हक्काच्या जपणूकीसाठी नवीन काय करता येईल याच्या शिफारशी करण्याची जबाबदारी या आयोगावर असते. मुख्यत: बाल न्याय कायदा, बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक कायदा आणि शिक्षण हमी कायद्याची अंमलबजावणी चांगली व्हावी यासाठीचे सनियंत्रण करणारी महत्वाची संस्था म्हणून या आयोगाकडे पाहिले जाते. त्यास बालकांच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास त्याची जनसुनावणी घेवून प्रशासनास आदेश देण्याचे अधिकार आहेत. बालकांचे हक्क व अधिकारांच्या जपणूकीसाठी कार्यरत असलेल्या व्यक्तीला या आयोगावर संधी दिली जाते.

  •  

———————————–

असा आहे आयोग..

अध्यक्ष : ॲड संजय विष्णू पुराणिक (तळोदा, नंदूरबार)

सदस्य सर्वश्री : गीतांजली बालाजी बुटी (नागपूर), शुभांगी संजय तांबट (सिंहगड रस्ता पुणे), संजय निळकंठराव लाखेपाटील रामनगर जालना, अतूल आनंदराव देसाई (तुळजाभवानी कॉलनी कोल्हापूर), प्रविण संजाबराव भुजाडे ( नवसारी अमरावती), मिलन देवेंद्र जंगम (वानवडी, पुणे)

————-

कोल्हापूरला प्रथमच संधी..

अतूल देसाई यांच्या रुपाने कोल्हापूरला या आयोगावर काम करण्याची प्रथमच संधी मिळत आहे. देसाई गेली चोवीस वर्षे या क्षेत्रात काम करत असून राज्य शासनाच्या विविध समित्यावर, कायदा मसुदा समितीवरही त्यांनी काम पाहिले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!